साक्री । ’सीएम टू पीएम’ या घोषवाक्याखाली 11 एप्रिल रोजी महात्मा गांधी फुले या महापुरूषाच्या जयंतीचे औचित्य साधून आमदार बच्चू कडू व शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वात नागपूर येथील देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापासून निघालेली शेतकरी आसूड यात्रा बळसाणे येथे पोहोचली. राजमाता अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय संस्थान मार्फत व ग्रामस्थांमार्फत आसूड यात्रेचे प्रमुख आ. बच्चू कडू यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
आ. कडू म्हणाले की, लेखाजोखा काढला तर शेतकरी कर्जबाजारी नसून सरकार कर्जबाजारी असल्याचे समोर येईल सरकारने नेहेमीच पिकवणार्यांपेक्षा खाणारांचा विचार केल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. सरकाराला कर्जमाफी द्यावीच लागेल व शेती मालाला रास्त भाव मिळावा, शेतमालावरी निर्यात बंदी कायमचीच हटवावी, कुशल-अकुशल कामगारांना चौथ्या श्रेणीतील शासकीय कर्मचार्यांप्रमाणे प्रतिदिन मजूरी द्यावी माजी सैनिक आणि शहिदांच्या विधवा पत्नी यांच्यासाठी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी शहरी, ग्रामीण असा भेदभाव न करता सरसकट अनुदान द्या आदी मागण्यांसाठी यात्रा काढल्याचे कडू यांनी सांगितले. सूत्रसंचलन संदीप गर्दे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येथील सरदार सुर्यवंशी, न्यानेश्वर धनगर, नंदू धनगर, रामदास मासुळे, लक्ष्मण मासुळे, शाना पाटील, किशोर हालोरे, भैया हालोरे, देवेंद्र गिरासे व राजमाता अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय संस्थेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले
सरकारला धडा शिकवणार
सकाळी आठ वाजता विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात आमदार बच्चू कडू म्हणाले की, आजवर देशाने जातीय व धर्मवाद पाहिला आहे मात्र जगाच्या पोशिंदा असणार्या भारत मातेच्या शेतकर्याला जगण्यासाठी आता आपल्या देशात कट्टर शेतकरीवादाची गरज आहे. चूकीचे निर्णय घेऊन शेतकर्यांच्या छातीवर वार करणार्या सरकाराला धडा शिकवण्याची तयारी शेतकर्याने केली पाहिजे. शेतकर्याला अपमानास्पद जीवन जगण्याची वेळ येऊ नये, यासाठी जात पात पक्ष संघटना विसरून एकत्र येऊन आसूड यात्रेला बळकट करण्याचे आवाहन कडू यांनी केले.