भादलीची रहिवासी; एकीकडे वडिलांच्या शेतीचे नुकसान, दुसरीकडे महाविद्यालय व खाजगी क्लासमधून फीचा तगादा
जळगाव : अतिवृष्टीमुळे शेतीचे हमीचे उत्पन्न हातातून निसटले. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना आई वडिलांची होत असलेली शेतकरी बापाची कसरत तसेच महाविद्यालयीन तसेच क्लासची फी भरण्यासाठी पैशांची व्यवस्था करताना पित्याची दमछाक, त्यामुळे पित्यावर अधिकचा पैशांचा भार नको म्हणून नैराश्यात आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थीनी यामिनी प्रमोद पाटील (वय 17 रा. भादली) हिने विषप्राशन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
यामिनीचे वडील हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पत्नी, मुलगा, मुलगी असा त्यांचा परिवार आहे. मुलगी यामिनी ही शहरातील महाविद्यालयात बारावी सायन्सचे शिक्षण घेत होती. तर त्यांचा मुलगा लुकेश हा नशिराबाद येथे आयटीआयचे शिक्षण घेतोय. महाविद्यालयीन तसेच क्लासची फि भरण्यासाठी यामिनी हीने आई वडिलांकडे आग्रह धरला होता. काही प्रमाणात पैश्यांची जुळवाजुळव करून पित्याने मुलीची फि भरली होती. उर्ववित फि लवकरच भरतो, असा विश्वास त्यांनी मुलीला दिला होता. दरम्यान पैसे भरण्यासाठी यामिनी हिला महाविद्यालय तसेच खासगी क्लासच्या ठिकाणी वारंवार आठवण करून पैसे भरण्याचे बजावले जात होते. एकीकडे पैश्यांचा तगदा तर दुसरीकडे पैसे जमवाजमव करताना पित्याची होणारी कसरत हे बघीतल्यानंतर बापावर अधिकचा पैश्यांचा भार नको, यामुळे यामिनी गेल्या काही दिवसांपासून ताणतणावत होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
आई-वडील भुसावळला गेले असताना घरात एकटी असलेल्या यामिनीने घेतले विष
आई वडिल भुसावळ येथे शनिवारी नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यास गेले होते. त्यामुळे घरी यामिनी ही एकटीच घरी होती. दुपारी तिने किटकनाशक औषध प्राशन केले.दुपारी आई वडिल घरी आल्यानंतर यामिनी हिने आपण औषध प्राशन केल्याची माहिती दिल्याने दाम्पत्यास जबर मानसिक धक्का बसला. त्यानंतर तिला वाहनात टाकून तत्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात आणले. याठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. घटना कळाल्यानंतर नातेवाईकांसह ग्रामस्थांनी रूग्णालयात धाव घेतली. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.