दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आक्रमकच: अमित शहांसोबतच्या बैठकीत समाधानी नाही

0

नवी दिल्ली: नव्या कृषी कायद्यांविरोधात उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, केरळ आणि पंजाबच्या शेतकरी संघटनांनी २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी ‘दिल्ली चलो’ आंदोलनाची हाक दिली होती. यात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत. दिल्लीच्या सीमेवर गेल्या पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. शेतकरी आंदोलकांवर लाठीचार्ज, अश्रू धुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला गेला. तरीही आंदोलक शेतकऱ्यांनी मोर्चा सुरूच ठेवला. अखेर आंदोलक शेतकऱ्यांना सरकारने चर्चेसाठी बोलविले आहे. आज बुधवारी २ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक सुरु झाली आहे. बैठकीला शेतकरी आणि कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, रेल्वे मंत्री पियुष गोयल हजर आहेत. बैठक सुरु आहे मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही.

शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. दिल्ली-नोएडा सीमेवर शेतकऱ्यांचे जत्थे दाखल झाल्यानं दिल्ली-उत्तर प्रदेशला जोडणारा महामार्ग बंद करण्यात आला आहे.

नवे कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. मागण्यांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची शेतकऱ्यांची तयारी असल्याचे देखील संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.