-मोर्चेकरी शेतकर्यांना चर्चेचे निमंत्रण
-सर्वपक्षीयांचा लाँग मार्चला पाठींबा
-आज विधानभवनाला घेराव घालणार
मुंबई : 165 किमीचे अंतर कापून 40 हजार शेतकर्यांचा सहभाग असलेला लाँग मार्च मुंबईत धडकला आहे. या लाल वादळाने फडणवीस सरकारच्या उरात चांगलीच धडकी भरली आहे. सोमवारी विधानभवनावर हा मोर्चा धडकण्याआधीच सरकारने मध्यस्थी करत तोडगा काढण्यासाठी मोर्चेकर्यांना चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे. शेतकर्यांच्या या लाँग मार्चला शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीसह काँग्रेस पक्षानेही पाठींबा दिला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी मोर्चातील शेतकर्यांची विक्रोळीत भेट घेतली. त्यानंतर शेतकर्यांच्या शिष्टमंडळाची सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा होईल, असे आश्वासन महाजन यांनी दिले.
शेतकरी नेत्यांची घेतली भेट
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन चर्चेचे आश्वासन दिल्यानंतर लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नाही, मागण्या मान्य होईपर्यंत विधानभवनाला घेराव घालणार, असा निर्धार मोर्चेकर्यांनी व्यक्त केला. त्यावर, लिखित आश्वासनाच्या मागणीवर चर्चा होईल आणि सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघेल, असा विश्वास महाजनांनी व्यक्त केला. महाजन यांच्यासोबत शेतकरी नेत्यांची प्राथमिक चर्चा झाली. अजित नवले, अशोक ढवळे, शेकापचे जयंत पाटील, कपिल पाटील, जीवा गावित या बैठकीला उपस्थित होते. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना तातडीने अकोल्याहून मुंबईला पाचारण करण्यात आले आहे. रात्री मोर्चेकर्यांशी होणार्या संभाव्य चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी फुंडकरांना मुंबईत बोलावल्याचे भाजपच्या सुत्रांनी सांगितले.
काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेचा पाठींबा
नाशिकमधून निघालेला शेतकर्यांचा लाँग मार्च मुंबईत दाखल झाला आहे. हा मोर्चा आज सोमवारी म्हणजेच 12 मार्चला विधीमंडळाला घेराव घालणार आहे. किसान सभेने हा मोर्चा काढला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे संध्याकाळी पाच वाजता सोमय्या मैदानावर किसान मोर्चातील शेतकर्यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे यांनी किसान सभेचे सचिव अजित नवले यांना फोन करुन, पाठिंबा जाहीर केला. मुंबईत आल्यानंतर या लाँग मार्चमध्ये मनसैनिकही सहभागी होतील, असे राज ठाकरे अजित नवले यांना सांगितले आहे. शेतकरी मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचा मनापासून पाठिंबा असल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले आहे. सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे शेतकर्यांच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी उभे राहतील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही ट्वीट करुन किसान लाँग मार्चला पाठिंबा जाहीर केला आहे. मुलुंड टोलनाक्यावर काँग्रेसने शेतकर्यांचे स्वागत केले होते. शिवसेनेनेही या मोर्चाला पाठींबा दिला आहे. प्रशासनाने या मोर्चाची गंभीर दखल घेतली असून मुंबई कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच कोंडी टाळण्यासाठी वाहतुकती बदल करण्यात आला आहे.
या आहेत शेतकर्यांच्या मागण्या
संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, वन हक्क कायद्याची अंमलबजावणी, नद्या जोड प्रकल्पांचा प्रश्न, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ, श्रावणबाळ पेन्शन योजना, बोंडअळी व गारपीट ग्रस्त शेतकर्यांचे प्रश्न
* कसत असलेल्या वनजमिनी शेतकर्यांच्या नावावर कराव्यात
* शेतकर्यांना विनाअट कर्जमुक्ती द्या
* शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या
* स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अमलबजावणी करा
* वन अधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा
* पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवून राज्यातील शेती समृद्ध करा