शेतकरी विरोधी कायदे हे शेतकऱ्यांचे खच्चीकरण करण्यासाठीच निर्माण केले

0

किसानपुत्र शिबीरात कायदेतज्ज्ञ सागर पिल्लारे यांचे मत

अंबाजोगाई : शेतकरी विरोधी कायदे हे शेतकऱ्यांच्या नितीमुल्यांचे खच्चीकरण करण्यासाठीच निर्माण केले आहेत असे मत कोल्हापुर येथील कायदेतज्ज्ञ सागर पिल्लारे यांनी “कायद्याच तत्वज्ञान आणि शेतकरी विरोधी कायदे” या विषयावर किसानपुत्र आंदोलनाच्या पाचव्या राज्यस्तरीय शिबीरात बोलतांना व्यक्त केले.

आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सागर पिल्लारे यांनी कायदा कशाला म्हणायचे याचे चार निकष सांगितले. १९ व्या शतकाच्या शेवटच्या काळात शेतकरी विरोधी कायदे निर्माण व्हायला सुरुवात झाली आसल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, मानवी कायदे हे उच्चतर मानवी नैतिक मुल्याशी, माणसाच्या हिताशी सुसंगतच असले पाहिजे. शेतकरी विरोधी कायद्दांची उपयुक्तता आपल्याला शेतकऱ्यांच्या दैनंदिन आयुष्यात दिसली पाहिजे. मात्र ती तशी दिसून येत नाही. शेतकरी विरोधी कायद्दात व्यक्ती ला प्राधान्य देण्यात आले आहे. गुन्हे थांबवणे हे कायद्दाचे निश्चितच काम आहे, मात्र सदगुण प्रस्थापित करणे हे कायद्दाचे काम नाही. आज समाजवादीय व्यवस्थेमुळे अनेकांचे वाटोळे झाले आहे. आज समस्या निर्माण झाली की कायदे करा अशी मागणी होते मात्र कायदे निर्माण करतांना वेगळीच परिस्थिती निर्माण होते. कायदे हे सामान्य माणसांच्या कल्याणासाठीच असतात असा समज निर्माण झाला आहे. शेतकरी विरोधी कायदे हे शेतकऱ्यांच्या नितीमुल्यांचे खच्चीकरण करण्यासाठीच निर्माण केले आहेत असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.