शेतकरी विरोधी कायद्यांचा निषेध

0

जळगाव। यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या गावचे शेतकरी साहेबराव करपे व त्यांच्या पत्नी मालती करपे यांनी 19 मार्च 1986 रोजी आपल्या चार अपत्यांसह पवनार आश्रमात आत्महत्या केली होती. घटनेच्या 31व्या स्मृतीदिनानिमित्त शेतकर्‍यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी आणि शेतकरीविरोधी कायद्यांचा निषेध करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाकडून रविवारी राज्यभर अन्नत्याग आंदोलन पुकारण्यात आले. यात शहराती शिवतिर्थ मैदानाजवळ शेतकर्‍यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. कमाल शेतकरी धारणा कायदा, आवश्यक वस्तुचा कायदा व जमीन अधिग्रहण कायदा हे तीन कायदे रद्द करण्याची मागणी यावेळी शेतकर्‍यांकडून करण्यात आली.

जिल्हाभरातून शेतकर्‍यांची आंदोलन स्थळी भेट
या आंदोलनात जिल्हाभरातून विविध शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले. यामध्ये शेतकरी संघटनेचे कडुअप्पा पाटील, समाजिक कार्यकर्त्या वासंती दिघे, प्रा.शेखर सोनाळकर, जैन हिल्सचे भुजंग बोबडे, कुंजबिहारी रावत, आशिष पाटील, आसोद्याचे पंडित अटाळे, वसंतराव महाजन, किनगावचे गोपाल चौधरी, कैलास कोळी, राजश्री पगारे, वैशाली झाल्टे, सुरवाडे येथील दगडू शेळके, उल्हास चौधरी आदींनी सहभाग घेतला.

नागरिकांनी सहवेदना दाखविणे गरजेचे
शेतकरी विरोधातील कायदे रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. राज्यात शेतकर्‍यांचा आत्महत्येचे प्रमाण वाढले असून आर्थिक मदत, पॅकेज किंवा कर्जमाफी यासारख्या उपाययोजना केली असली तरी आजही परिस्थिती बदलेले नाही. कमाल शेतजमीन धारणा कायदा, आवश्यक वस्तुंचा कायदा व जमीन अधिग्रहण कायदा रद्द करण्याची मागणी यावेळी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आली. हे कायदे मुळ घटनेच्या तत्वांशी विसंगत व पक्षपात करणारे व शेतकर्‍यांचा व्यवसायस्वातंत्र्य नाकारण्यात येत असल्याचे या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी उपोषणाची हाक दिली होती. तसेच ते स्वतः यवतमाळ जिल्ह्यातील महागावामध्ये उपोषणला बसले आहेत. 19 मार्च रोजी 1986 रोजी साहेबराव करपे यांनी केली आत्महत्या ही पहिली जाहीर झालेली शेतकर्‍याची आत्महत्या आहे. म्हणून याच तारखेला उपोषणासाठी 19 मार्चची निवड करण्यात आलेली आहे. शेतकर्‍यांची आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती समजून तातडीने उपाययोजना करायला हव्यात, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.