शेतकरी विरोधी सरकारचा निषेध करत शेतकरी आंदोलन मागे

0

नवी दिल्ली- काल हरिद्वार येथून निघालेली किसान क्रांती यात्रा दिल्लीत धडकल्यानंतर पोलिसांनी अमानुषपणे लाठीहल्ला करून शेतकऱ्यांना जखमी केले. अखेर रात्री उशिरा दिल्लीतील किसान घाट येथे जाऊन आंदोलन मागे घेण्यात आले. शेतकऱ्यांनी किसान घाट येथे फुले वाहून आपले आंदोलन संपल्याचे जाहीर केले. भारतीय किसान यूनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी हे आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले. हे सरकार शेतकरी विरोधी असून त्यांनी आमची कोणतीच मागणी मान्य केलेली नाही. आम्ही हे आंदोलन आता मागे घेत आहोत. आंदोलक शेतकऱ्यांनी आपापल्या घरी परतावे असे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी, मंगळवारी रात्री उशिरा दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेश सीमेवरून शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश दिला.

दरम्यान, किसान क्रांती यात्रा घेऊन किसानघाटला जाऊन तेथून संसदपर्यंत मोर्चा नेण्याचे नियोजन केलेले शेतकरी आणि पोलिसांमध्ये मंगळवारी हिंसक संघर्ष दिसून आला. शेतकऱ्यांना दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर रोखण्यासाठी उत्तर प्रदेश आणि दिल्ली या दोन्ही राज्याच्या पोलिसांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. अखेर मंगळवारी रात्री सुमारे १२.३० वाजता पोलिसांनी बॅरिकेड्स बाजूला केले आणि शेतकऱ्यांना दिल्लीत जाण्यास परवानगी दिली.