खडकी । शेतकरी व लष्करी जवान हे खर्या अर्थाने देशाचे पाठबळ व कसंध स्वरुपाची अशी ताकद आहे, असे मत प्रसिद्ध सिने अभिनेते व नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले. भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या ५१२ सेना वर्कशॉप मजदूर संघाच्या वतीने नुकतेच विश्वकर्मा जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी अनासपुरे बोलत होते. ब्रि. विजय देशमुख संघटनेचे अध्यक्ष जालिंधर कांबळे, सरचिटणीस मिलिंद लांजेकर, अधिकारी वर्ग व कामगार उपस्थित होते.
शेतकरी व लष्करी जवानांचे हात बळकट केल्यास निश्चिपणे समृद्ध व विकसनशील देश घडेल. या कामी शासनाने सकारात्मक उपाययोजनांद्वारे त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. देशमुख यांनी कामगारक्षेत्रात भगवान विश्वकर्मा यांनी दिलेले महत्त्वाचे योगदान यावेळी विशद केले. संघटनेच्यावतीने ‘नाम’ला देशमुख व संघटनेच्या पदाधिकारी यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा धनादेश अनासपुरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जालिंधर कांबळे यांनी केले. स्वागत विजय देशमुख यांनी केले तर आभार अरविंद तावरे यांनी मानले. निलेश खेडेकर, श्रीपती पाटील, किरण खटावकर, गुलाब रावते, जितेंद्र सोनार, अशोक शिंदे, ज्ञानदेव शिंदे, नरेंद्र गावडे, गणेश पानसरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.