पुणे-शेतकरी संपाचा मार्केटयार्ड येथील बाजारावर कोणताच परिणाम झालेला नाही. घाऊक आणि किरकोळ बाजारात फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक स्थिर आहे. रविवारी संपाच्या भीतीने मागणी वाढल्याने परिणाम दिसून येत होता, मात्र सध्या तरी भाज्यांसह फळे, फुले आणि भुसार मालाचा मुबलक पुरवठा असून दरही अस्थिर असल्याचे बाजार समितीचे पर्यवेक्षक प्रकाश मारणे यांनी सांगितले.
तसेच शेतकरी नेहमीप्रमाणेच शेतमाल विक्रीसाठी आणत आहेत. व्यापारी, किरकोळ विक्रेते तसेच ग्राहकांकडूनही भाज्यांना चांगली मागणी असून शेतकरी संपाचा कोणताही परिणाम सध्या तरी दिसून येत नाही. दोन दिवस पाऊस पडल्याने काही प्रमाणात शेतमाल बाजारात कमी दाखल झाला आहे. मात्र, हा परिणाम नक्कीच संपाचा नाही. मागणीच्या तुलनेत ही आवक पुरेसी असल्याने दरात वाढ अथवा घट झाली नसल्याचे आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.
सद्य:स्थितीत अनेक पिके काढणीला आली आहेत. त्यातच मान्सूनपूर्व पाऊस सर्वत्र कोसळत आहे. माल न काढल्यास त्याचे नुकसान होईल. या भितीपोटी शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीमाल विक्रीला आणत आहेत. भाज्यांना मागणी चांगली असल्याने त्यास दरही चांगला मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. आवक अशीच टिकून राहिल्यास शेतकरी संपाचा दरावर कोणताच परिणाम होणार नसल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
राष्ट्रीय किसान महासंघ, किसान क्रांती आणि अन्य संघटनांच्या वतीने शेतीमालास हमीभाव, सरसकट कर्जमाफी आणि वीज बिलमुक्ती आदी मागण्यांसाठी 1 ते 10 जून अशी संपाची घोषणा करण्यात आली आहे. त्याचा आज सातवा दिवस असून आजपासून हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रीय किसन महासंघाने दिला आहे. तसेच शेतकरी नेते अजित नवेले हे देखील संपात सक्रिय सहभाग घेणार आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम शेतमाल आणि भावावर होण्याची शक्यता आहे.