येवला । राज्यव्यापी शेतकरी संपाचा विषय तापलेला असताना एका तरुण शेतकर्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकर्यांचा संप या आत्महत्येमुळे अधिक चिघळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकर्याने आत्महत्या केली आहे, त्यानेही महाराष्ट्र बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता. नवनाथ चांगदेव भालेराव असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव असून ते 30 वर्षांचे होते. सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विष पिऊन त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे.
कर्जबाजारीपणाला कंटाळून केली आत्महत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आयुष्य संपवल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या पाच दिवसांपासून नाशिक इथल्या पाटोदा येथे शेतकरी आंदोलनात भालेराव यांनी सक्रिय सहभाग घेतला. 5 जून रोजी मध्यरात्री भालेराव यांनी विष पिऊन स्वतःचे आयुष्य संपवले. कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून भालेराव यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. 1 जूनपासून शेतकर्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात नवनाथ भालेराव यांनी सहभाग घेऊन शासनाने शेतकर्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी लावून धरली होती.
नवनाथ हे एकत्रपद्धत कुटुंबात राहत होते. त्यांची संपूर्ण शेती वडिलांच्या नावावर असून त्यांनी आपल्या शेतात तीन वर्षांपासून द्राक्ष बागेची लागवड केली होती. त्यासाठी वडिलांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पिंपरी सोसायटीमार्फत 13 मे 2013 रोजी सुमारे 4,50,000 रुपयांचे कर्ज घेतले होते. गेल्या वर्षी द्राक्षाचे पिक चांगले आले मात्र अस्मानी संकटामुळे हाताशी आलेले पिक गेले. तर यंदा द्राक्ष बागेवर किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्न मिळाले नाही. द्राक्षबागेसाठी घेतलेल्या औषधांची उधारीही भालेराव यांच्यावर होती, अशी माहिती आहे. दरम्यान भालेराव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, आईवडील व भाऊ असा परिवार आहे.