अहमदनगर । राज्यात कालपासून सुरू असलेल्या शेतकर्यांच्या संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. शेतकर्यांच्या मागण्या आणि आंदोलन रास्त आहे. मात्र, त्यांनी संयम आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन केले पाहिजे, असे सांगतानाच, शेतकर्यांचं शिष्टमंडळ सोबत आल्यास या प्रश्नी मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची तयारी आहे, असे अण्णांनी म्हटले आहे.
शेतकरी संपाच्या दुसर्या दिवशी हजारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली आहे. सहन करण्याची क्षमता संपल्याने शेतकरी नाइलाजास्तव रस्त्यावर उतरला आहे. सरकार दाद देत नसल्यामुळेच त्यांना कायदा हातात घ्यावा लागत आहे. अशा वेळी सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करून मागण्यांची योग्य ती दखल घ्यायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. शेतमालाला रास्त बाजारभाव मिळत नसल्याने शेतकर्याची कशी वाताहत होते हे मी लहानपणापासून माझ्या घरातच अनुभवले आहे. आंदोलक शेतकर्यांच्या वेदनांची मला जाणीव आहे. मात्र, ही आंदोलने शांततेने झाली पाहिजेत, असे ते म्हणाले. शेतकर्यांच्या प्रश्नावर माझी दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा झालेली आहे. ते चर्चेला तयार आहेत. शेतकर्यांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ चर्चेसाठी तयार असेल तर मी पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.