दौंड : राज्य सरकारची फसवी कर्जमाफी आणि शेतकरीविरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी दौंडमधील शेतकर्यांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी संपला सुरुवात केली. तालुक्यातील कानगाव येथे ग्रामदैवतेला दुधाचा अभिषेक घालून या संपाला सुरुवात करण्यात आली. गावाच्या परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनीदेखील या संपाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. शेतकर्यांना देण्यात येणारी कर्जमाफी ही कसल्याही प्रकारचे निकष न लावता देण्यात यावी, शेतकर्यांचे राहणीमान उंचवावे तसेच पिकांना योग्य हमी भाव द्यावा, यासह इतर काही प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. तसेच याला राज्यातील सर्व शेतकर्यांनीदेखील पाठिंबा दर्शवावा, असे आवाहन कानगावमधील शेतकर्यांनी केले आहे.
खा. सुळे यांची तातडीने धाव
शेतकर्यांनी हा संप सुरु केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंडमधील या शेतकर्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घातल्या. यावेळी शेतकर्यांनी आपल्याला असलेल्या सर्व अडचणी आणि मागण्या खा. सुळे यांच्यासमोर मांडल्या. शेतकर्यांना त्यांनी मदतीचे आश्वासन देत त्यांच्या मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी खा. सुळे यांनी सरकारच्या कामगिरीवर जोरदार टीका केली. सरकारने शेतीविरोधी धोरणांचा सपाटा लावल्यामुळे आज राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकर्यांची दिशाभूल करणार्या कर्जमाफीचे गाजर दाखवून मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांची फसवणूक केली आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच शेतकर्यांवर दुसर्यांदा संप करण्याची वेळ येत आहे. यातून सरकारची शेतकर्यांविषयी असलेली अनास्था आणि बेपर्वाई दिसून येते, असेदेखील खा. सुळे म्हणाल्यात.