भुसावळ। तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांना भेडसावणार्या समस्या दूर करण्यात याव्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना निवेदनाद्वारे करण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील यांनी गुरुवार 22 रोजी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन आपल्या मागण्या सादर केल्या.
कामे पुर्ण न करणार्या ठेकेदारांना काळ्या यादी
जोगलखेडा-साकेगाव ते चोरवड रस्त्याची दुरुस्ती करावी, वाघुर नदीवर जोगलखेडा येथे बंधारा बांधून जोगलखेडा व भानखेडा या गावाची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यात यावी, जलयुक्त शिवारची कामे कामे पूर्ण न केल्यास ठेकेदाराची नावे काळ्या यादीत टाकण्यात येण्याची मागणी केली आहे.
पाणी पुरवठ्याची समस्या सोडवावी
साकेगाव, कंडारी जिल्हा परिषद गटासह भुसावळ तालुक्यातील खेड्यापाड्यांना जोडणार्या रस्त्यावर खड्डे पडले असल्याने ते त्वरीत बुजविण्यात यावे, जलयुक्त शिवार फेरीत सहभागी न झालेल्या अधिकार्यांवर कारवाई करावी, साकेगाव व कंडारी येथील पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी जीवन प्राधिकरण जलस्वराज्य पाणीपुरवठा योजना तात्काळ मार्गी लावावी, जिल्हा परिषद शाळांमध्ये संरक्षण भिंत बांधण्यात यावी, मुलांना शासकीय योजनेचा लाभ विविध शैक्षणिक साहित्य पुरविण्यात यावी, साकेगाव शिवारातील रेल्वेच्या तिसर्या, चौथ्या लाईनसाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या शेतकर्यांना महामार्गाप्रमाणे मोबदला देण्यात यावा, कुर्हा, बोदवड शिवारातील प्राण्यांपासून शेतातील पिकांसाठी संरक्षण मिळावे. अशा मागण्या करण्यात आल्या आहे.