शेतकरी हिताला विरोधकांचा खोडा

0

मुंबई : महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्‍यांनी थेट मतदान करण्यासाठी सुधारणा करणार्‍या विधेयकाला सोमवारी विरोधकांनी कडाडुन विरोध केला, त्या मुळे हे विधेयक आता संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठवण्यात आले आहे. ४५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्यात येउन त्यांनंतर हे विधेयक परिषद सभागृहात चर्चेसाठी पाठवण्यात येइल व संमत करण्यात येईल. सहकार क्षेत्रातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची मक्‍तेदारी मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

सध्या संपुर्ण राज्यात ३०६ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती थेट शेतकर्‍यांशी जोडली गेली असली, या समितीद्वारे शेतकर्‍यांच्या शेतीमालाला थेट बाजारपेठ मिळावी हा उद्देश असला तरी या बाजार समितीच्या निवडणुकांमधे मतदान करण्याचा हक्क विकास सोसायटीच्या संचालकाला आणि ग्रामपंचायत सदस्यांला असतो, त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार अटळ असतो, शेतकर्यांची बांधीलकी न रहाता या निवडणुका उरकल्या जातात. त्यात या निवडणुकीत येणारा 25 ते 40 लाख खर्च कमी करण्यासाठी या महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन सुधारणा विधेयक 2017 सोमवारी सभागृहात आणले गेले. बाजार समिती क्षेत्रात राहणार्‍या व किमान 10 आर (दहा गुंठे) इतकी जमीन असलेले आणि पाच वर्षात किमान तीनवेळा संबंधित बाजार समितीमध्ये कृषी उत्पन्नाची विक्री केली असलेले शेतकरी मतदानास पात्र असणार आहेत. मात्र या विधेयकाला विरोधकांनी कडाडुन विरोध करत हे विधेयक संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठवण्याचा आग्रह धरला.

बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मताधिकार मिळवून देण्याचा हा निर्णयही महत्त्वपूर्ण समजला जात आहे. मात्र थेट निवडणुका होणे योग्य नाही असा पवित्रा विरोधकांनी घेतला, त्या मुळे संयुक्त समितीकडे विचारार्थ गेलेल्या या विधेयकाच्या मंजुरीसाठी आता किमान 6 महिने ते वर्षभर वाट पहावी लागते. या विधेयकात काही सुधारणा असतील तर त्या विरोधकांनी सुचवायला हव्या होत्या पण तसे न करता विरोधकांनी जाणीवपुर्वक विधेयक लांबवण्याची भुमीका घेतल्याचे मत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मांडले.

हे विधेयक संमत होउन जर या बाजार समितीच्या निवडणुका थेट पध्दतीने झाल्या तर गावात वैर वाढेल . सरपंच सह सगळ्याच निवडणुका थेट जनतेतून करून सरकारला सहकार चळवळ मोडून काढायची आहे. असेच असेल तर पंतप्रधान, राष्ट्रपती निवडणुका ही जनतेतून घ्या.
-विजय वडेट्टीवार, काँग्रेस सदस्य, विधानसभा