शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ रावेरात प्रहारचा 17 रोजी बैलगाडी जनआक्रोश मोर्चा

रावेर : यावलसह रावेर तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळामुळे झालेल्या केळी नुकसानीची त्वरीत भरपाई मिळावी यासह विविध न्याय मागण्यांसाठी प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांच्या समर्थनात बैलगाडी जनआक्रोश मोर्चा शुक्रवार, 17 रोजी दुपारी 12 वाजता शहरातील छोरीया मार्केट ते तहसील कार्यालयादरम्यान काढण्यात येणार आहे. शेतकर्‍यांसह शेतमजुरांनी न्याय व हक्कासाठी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विविध मागण्यांसाठी मोर्चा
अवकाळी पाऊस व वादळामुळे झालेल्या नुकसानाची त्वरीत भरपाई मिळावी, रासायनिक खतांच्या किंमती कमी कराव्यात, रात्रीचे भारनियमन बंद करून 10 तास सुरळीत वीजपुरवठा करावा, केळी पीक विम्याची रक्कम त्वरीत मिळावी, जळालेले रोहित्र कोणत्याही अटी शर्ती न ठेवता 24 तासाच्ंया आत त्वरीत मिळावे आदी मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चात सहभागाचे आवाहन प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश चिंधू पाटील, प्रहार जिल्हाध्यक्ष राजेंद्र महाजन, प्रहार युवक जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोरसे, योगेश पाटील, रावेर तालुकाध्यक्ष पिंटू धांडे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष वंदना बावस्कर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष वसीम शेख, युवक तालुकाध्यक्ष योगेश निकम आदींनी केले आहे.