शेतकर्‍यांचा दिल्लीत एल्गार!

0

20 नोव्हेंबरला देशभरातील 180 संघटना आंदोलन करणार;  एक लाख शेतकरी एकत्र येणार;  किसान मुक्ती संसदेकडून आंदोलनाचे नियोजन
नवी दिल्ली : देशभरातील शेतकरी कर्जमाफी आणि हमीभाव या दोन प्रमुख मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत. याच मागणीसाठी देशभरातील शेतकरी संघटना 20 नोव्हेंबरला दिल्लीत आंदोलनासाठी एकत्र येत आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीसह देशभरातील तब्बल 180 शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी होतील. त्यामुळे या आंदोलनाच्या दिवशी दिल्लीत तब्बल लाखभर शेतकरी जमण्याची शक्यता आहे.

मागण्या मार्गी लागत नसल्याने निर्णय
कर्जमाफी आणि हमीभाव या दोन प्रमुख मागण्या मार्गी लागत नसल्याने देशभरातील शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. यासंदर्भात किसान मुक्ती संसदेने मागण्यांचा मसुदा सर्व प्रमुख राजकीय पक्षांनाही पाठवला होता. जेणेकरून हे प्रश्न संसदेत उपस्थित होतील. याशिवाय, शेतकरी संघटनांच्या बैठकीत सहभागी झालेल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही शेतीमालाचे घसरलेले दर, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ आदी मुद्द्यांवरून चिंता व्यक्त केली होती. मात्र, या मागण्या मार्गी लागत नसल्याने अखेर दिल्लीमध्ये आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे. यामध्ये सुमारे 180 संघटना सहभागी होणार आहेत.

हे निर्णायक आंदोलन, शेतकर्‍यांचा इशारा
कर्जमाफी, हमीभावासाठी देशातील अनेक ठिकाणी आंदोलनेही करण्यात आली. यामध्ये मध्यप्रदेशच्या मंदसौर येथे शेतकरी आंदोलनादरम्यान जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन शेतकर्‍यांचा मृत्यू झाला होता. या घटनेविरुद्ध वातावरणनिर्मिती करण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने देशभरात 10 हजार किलोमीटरची पदयात्रा काढली होती. या पदयात्रेची दिल्लीत सांगता होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 20 नोव्हेंबरला हे निर्णयाक आंदोलन करण्यात येणार आहे.

शेतकर्‍यांचे 34 हजार कोटींचे नुकसान
महाराष्ट्रातही शेतकर्‍यांमध्ये कर्जमाफीची प्रक्रिया लटकल्याने संताप आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील शेतकरीही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. शेतकर्‍यांना पिकाच्या हमीभावापेक्षा कमी पैसे मिळतात. परिणामी, एका हंगामात देशभरातील शेतकर्‍यांचे साधारण 34 हजार कोटींचे नुकसान होते, असा दावा अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने केला आहे. आपल्या मागण्यांसाठी आता 20 नोव्हेंबरला सर्व शेतकरी संघटना संसद रस्त्यावर आंदोलन करणार आहेत.