शेतकर्‍यांचा नगदी पिकांकडे कल

0

इंदापूर । दिवसेंदिवस खरिपाच्या पिकांच्या उत्पादनात घट होऊन मका हे नगदी पिक घेण्याकडे शेतकर्‍यांचा मोठा कल दिसून येत आहे. खरिपासाठी असणार्‍या क्षेत्रात खरीप पिकांऐवजी मक्याची लागवड झाल्याचे दिसून येते. त्याचबरोबर ऊस लागवड देखील मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी केल्याचे इंदापूर तालुका कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

मान्सूनच्या पावसाचे लवकर आगमन झाल्यामुळे तळाशी गेलेल्या विहिरी, कूपनलिकांच्या पाणीसाठ्यात मुबलक वाढ झाली. शेतकर्‍यांनी मोठ्या उमेदीने पडीक असलेल्या जमिनींच्या मशागती केल्या. खरिपांच्या पिकांबरोबरच मका, ऊस याबरोबरच भाजीपाल्यासारखी नगदी पिकांची लागवड शेतकर्‍यांनी केली. असे जरी असले, तरी इंदापूर तालुक्यामध्ये खरिपासाठी राखीव असणार्‍या क्षेत्रामध्ये घट झाल्याचे तालुका कृषी अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. खरीपाच्या क्षेत्रात मक्याची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा यंदा मक्याचे उत्पादन भरघोस निघणार हे मात्र निश्चित आहे. गेल्या चार-पाच वर्षांच्या तुलनेत यंदा पावसाने लवकरच कृपादृष्टी दाखवल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधान दिसून येते आहे. मान्सूनच्या चांगल्या पावसामुळे शेतकर्‍यांनी मक्याची पेरणी केल्याचे दिसून येते. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मक्याच्या क्षेत्रामध्ये वाढ झाल्याने अतिरिक्त उत्पादन व दराचीही चिंता शेतकर्‍यांना लागून राहिली आहे.

तालुक्यामध्ये ऊस पीकाच्या लागवडीसाठी राखीव असणार्‍या सरासरी क्षेत्रातील जवळपास 100 टक्के क्षेत्रामध्ये ऊस लागवड पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. तालुक्यात खरिपासाठी 9500 हेक्टर राखीव असून 2500 हेक्टर क्षेत्र बाजरीसाठी आहे. त्यापैकी अवघ्या 1300 हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली असून भाजीपाला व इतर नगदी पिके 500 हेक्टरमध्ये आहेत. खरीप क्षेत्रातील उर्वरीत क्षेत्रामध्ये शेतकरी मका या नगदी पेरणी करू शकतात. इंदापूर तालुक्यातील एकूण क्षेत्रामधून 26 हजार हेक्टर क्षेत्र उसासाठी असून यातील जवळजवळ 100 टक्के ऊस लागवड यंदा पूर्ण होईल. 8500 हेक्टर क्षेत्र मक्यासाठी असून आजपर्यंत 7500 हेक्टर क्षेत्रामध्ये मक्याची पेरणी पूर्ण झाली असून यामध्ये आणखी वाढ होऊ शकते, अशी माहिती तालुक्याचे कृषी अधिकारी सुर्यभान जाधव यांनी दिली.