शेतकर्‍यांचा फुटबॉल करू नका : मकरंद अनासपुरे

0

पुणे । डॉक्टरांच्या मारहाणप्रकरणी सर्व डॉक्टरांनी एकत्रीत येऊन संप पुकारला होता. त्यामुळे अनेक रूग्णांना आपला जीव गमवावा लागला. असाच संप शेतकर्‍यांनी पुकारला तर आपली अवस्था वाईट होईल. व्यापारी आणि सरकार यांच्यामध्ये त्यांचा फुटबॉल होत आहे. हे बंद झाले पाहिजे. आत्तापर्यंत अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र त्यांचा माल विकत घेणार्‍या व्यापार्‍यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत का, असा प्रश्न ज्येष्ठ अभिनेते व नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

नाम फाऊंडेशच्या माध्यमातून जय जवान जय किसान ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेबद्दल अधिक माहिती देण्यासाठी अनासपुरे यांनी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या मोहिमेंर्तगत देशभरातील शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली जाणार आहे. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होणार असून येत्या 10 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता गणेश कलाक्रीडा मंच येथे होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते राज्यातील 20 शहीद कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख 50 हजाराची आर्थिक मदत देण्याचा छोटीखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजात शेतकरी व जवान हे दोन महत्वाचे घटक आहेत. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी विविध उपक्रम राबिवले जातात. समाजातील दुसरा महत्वाचा घटक समजल्या जाणार्‍या शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्याच्या हेतूने ही मोहीम राबवली जात आहे. नाम फाऊंडेशनने निधी मिळवण्यासाठी कोणाकडेही हात पसरले नाही वा कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले नाही. नाना पाटेकर यांनी स्वतः हा निधी शहीद कुटुंबियांना देण्याचे ठरविले आहे, अशी माहिती अनासपुरे यांनी यावेळी दिली. कर्नल जतकर याप्रसंगी उपस्थित होते.

शेतकर्‍याची अवस्था आईसारखी
आई मुलांना खाऊ घालते आणि स्वत: उपशी राहते, अशीच अवस्था देशातील शेतकर्‍यांची झाली आहे. शेतकर्‍यांना अच्छे दिन येण्यासाठी स्वामी नाथन आयोगाच्या शिफारसी मान्य झाल्या पाहिजेत. जास्त क्षमता असलेल्या गोडाऊनची निर्मिती झाली पाहिजे व संशोधनावर आधारित शेतीला प्राधान्य मिळण्याची गरज असल्याचे मत अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी यावेळी व्यक्त केले.