शेतकर्‍यांचा संप सदाभाऊ व्हाया सरकार!

0

सरकारचा विरोध सध्या प्रचंड प्रमाणात वाढत चाललेला दिसून येतोय. सरकारदेखील या परिस्थितीला विरोधक कसे जबाबदार आहे हे ठासून सांगायला कुठेच कमी पडत नाहीये. न भूतो न भविष्यती असं वातावरण महाराष्ट्रात सुरू आहे. सरकारकडून संप हाणून पाडण्यासाठी अतोनात प्रयत्न केले जात आहेत. मीडिया जबरदस्त पद्धतीने मॅनेज केला जातोय. पर्यायी मीडिया म्हणून वापरल्या जाणार्‍या सोशल माध्यमांवरदेखील अंकुश आणण्याच्या नानाविध क्लुप्त्या केल्या जाताहेत. विरोधात बोलणार्‍या मीडियावर नाना तर्‍हेचे दबावतंत्र आणले जाऊ लागलेय. ही स्थिती अराजकतेची आहे, संप असाच चालू राहिला तर महाराष्ट्रात आणीबाणी लागू होऊ शकते. बळीराजा सावध झालाय आपल्या हक्कांसाठी आणि अधिकारांसाठी. दरम्यान, या प्रक्रियेत राज्यकर्ते म्हणून मुख्यमंत्री आतापर्यंत सोयीची भूमिका घेत आले आहेत. या प्रक्रियेत महत्त्वाचे मानले जाणारे कृषिमंत्री कोणत्या तोंडाने समोर येऊ, कदाचित असा विचार करत गायब आहेत. यात एक नाव मात्र नाहक अक्षरक्षा झोडपून निघत आहे. ते म्हणजे सदाभाऊ खोत. 2014 च्या लोकसभा निवडणुका लागल्या आणि महायुतीचं जोरदार प्रोजेक्शन केलं गेलं. यादरम्यान आघाडी सरकारच्या काळात शेतकर्‍यांसाठी सरकारविरोधात लढणारे एक शेतकरी नेतृत्व विशेष गाजले. जनमताच्या जबरदस्त रेट्यावर निवडून येणारे खा. राजू शेट्टी यांनी याच नेतृत्वावर विश्‍वास ठेवत नवं सरकार आल्यावर सरकारमध्ये जाण्याची संधी दिली. अर्थातच या शेतकर्‍यांच्या उमद्या नेतृत्वाचं नाव ना. सदाभाऊ खोत.

सदाभाऊ नेमके कुठे चुकले याचे अवलोकन अर्थातच त्यांनी करायला हवे. कारण शेतकर्‍यांच्या एका-दुसर्‍या मागणीसाठी रस्ते अडवणारा हा कृषकांचा हिरो आता सरकारशी चर्चेची सेटलमेंट करतोय हा मुद्दाच बळीराजाला मान्य नाही. शेतकर्‍यांचे नेतृत्व म्हणून याआधी केलेल्या आंदोलनात मागण्या पूर्ण होईस्तोवर तडजोडीची भाषा न करणारे सदाभाऊ इथं मात्र सबगोलंकारी भूमिका घेत असल्याने स्वाभिमानीचे कार्यकर्तेदेखील संभ्रमात पडलेत. सत्तेत आल्यावर तरी कृषकांच्या समस्यांवर काम करू शकू अशी भूमिका घेत खा. राजू शेट्टींनी सदाभाऊंना सरकारात पाठविले. सरकारात गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी जास्तच सलगी झालेल्या सदाभाऊंनी राजू शेट्टींनी अक्षरशः स्किप केले. मंत्री म्हणून बंधने असतील मात्र कुठलाही निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांचेच नाव घेणारे सदाभाऊ एकदाही राजू शेट्टींना विचारतो किंवा पक्षाला विचारतो असं म्हटलेले दिसत नाहीत. सत्तेत असलेल्याच शिवसेनेचे मंत्री किंवा साधे आमदार देखील पक्षप्रमुखांशी चर्चेची भाषा करतात मात्र सदाभाऊंना ते योग्य का बरं वाटलं नाही? हा प्रश्‍न अनुत्तरित आहे.

सदाभाऊ सांगताहेत, शेती आणि शेतकरी माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. संपकाळात केवळ मला एकट्यालाच टार्गेट केले जातेय. मला काम करण्याची सवय आहे म्हणून मी करत राहतो. मात्र, एवढे करून मी शेतकर्‍यांसाठी बोलतो म्हणून मी मध्यस्थ आहे, एजंट आहे असे आरोप माझ्यावर लावले जातात, असे ते म्हणतात. त्याचबरोबर मी राजकारणी माणूस नाही. मी शेतकर्‍याच्या घरात जन्मलोय. माझ्यावर आरोप करून प्रतिभा उजळायचीय तर अवश्य उजळ करावी. प्राण गेला तरी चालेल मात्र शेतकर्‍यांची बाजू सोडणार नाही. शेतकर्‍यांना न्याय मिळावा हीच माझी भूमिका असल्याचेदेखील ते वेळोवेळी सांगतात. मग आज जे लाखो शेतकरी न्यायासाठी रस्त्यावर उतरलेत हे मूर्ख आहेत का? असाही प्रश्‍न यानिमित्ताने सदाभाऊंना करतोय. सदाभाऊ आणि राजू शेट्टी यांच्या दोघांच्याही भूमिका स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसमोर अगदी स्पष्ट आहेत. यामध्ये खरोखर कार्यकर्त्यांची कोंडी होत आहे.

संपात खरंतर विनाकारण सदाभाऊ शेतकर्‍यांच्या नजरेत व्हिलन झालेत. आरंभीच्या काळात जर त्यांनी पदाची चिंता न करता राजीनामा देऊन आंदोलनात घुसले असते तर आज शेतकर्‍यांचे खरे हिरो ठरले असते. आता काहीजण म्हणताहेत की त्यांना जाणूनबुजून मीडियाच्या समोर केलं जातंय. एका दृष्टीने बघितलं तर हा मुद्दा पटण्याजोगादेखील वाटतो. कारण कॅबिनेट दर्जाचे कृषिमंत्री जे निर्णयक्षमता बाळगून आहेत ते या काळात बेपत्ता आहेत आणि राज्यमंत्री ज्यांना निर्णयाचा अधिकारच नसतो त्याला मिडियासमोर येऊन सामना करावा लागत आहे. मात्र दुसरी बाजू अशी की एवढा अनुभव असलेल्या सदाभाऊंना ह्या गोष्टी समजत नसतील का? का ते स्वत:हून पुढे येताहेत? हे कळायला मार्ग नाही. एक मात्र नक्की की, शेतकर्‍यांसाठी ऊन, वारा, पावसाची चिंता न करता लढणारा हा लढवय्या आंदोलक नेता त्यांच्यातून गायब झालाय. सत्तेच्या लॉलीपॉपचा प्रचंड प्रभाव कमी वेळात पडल्याने कदाचित असं होत असावं. यामुळे शेतकर्‍यांसाहित स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्येदेखील नाराजी आहे. आता वेळ जवळपास संपलीय. सदाभाऊंचे मेटे होण्याच्या मार्गावर आहेत. बाकी सत्ताधारी संपात कितपत फूट पाडली हे संपाच्या वाढत्या तीव्रतेवरून लक्षात येतेय. मात्र यापेक्षा स्वाभिमानीत फूट पाडण्यात मात्र 100 टक्के यशस्वी झाले हे नक्की…!