शेतकर्‍यांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

0

नाशिक । सरकारने 2 दिवसांत मागण्या मान्य कराव्यात, मागण्या मान्य न केल्यास 13 जूनपासून निर्णायक लढा देण्यात येईल, असा इशारा सुकाणू समितीत देण्यात आला. यावेळी बैठकीत सरकारने दोन दिवसांत मागण्या कराव्या. जर तसे न झाल्यास रेल रोको, रस्ता रोको करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. 12 तारखेला राज्यतील सर्व तहसील कार्यालयांना धरणे देणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे. तर 13 तारखेला रेल रोको करण्याता निर्णय सुकाणू समितीच्या बैठकीत झाला आहे. शेतकरी संपाची पुढील दिशा ठरवण्यासाठी नाशिक येथे बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीला राजू शेट्टी, बच्चू कडू उपस्थित होते. मात्र त्यांच्या उपस्थितीमुळे गोंधळ निर्माण झाला. या बैठकीत काँग्रेस नेत्यांना शेतकर्‍यांनी रोखले त्यामुळे भाई जगताप खालीच बसले लागले.

एका संघटनेतून एक प्रतिनिधी घेणार
समन्वय समिती अजून मूळ स्वरुपात आलेली नाही, त्यावर चर्चा सुरु आहे. ज्यांची नावे येतील त्याच्यावर विचार करु. एका संघटनेतून एक जण घेतला जाईल आणि 13 जूननंतर पुन्हा बैठक घेणार, असे अजित नवले म्हणाले. आज पुन्हा नव्याने एकत्र आलो आहोत. शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करत आहे. पुणतांब्याच्या शेतकर्‍यांची चूक नाही. पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भोळ्या भाबड्या शेतकर्‍यांना नाडले. अशी टीका शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी यावेळी केली.

शेतकरी परीषदेत आगंतुक महिलेचा गोंधळ
सुकाणू समितीच्या बैठकीत एका आगंतुक महिलेने घोषणाबाजी सुरु केल्याने गोंधळ उडाला. कल्पना इनामदार असे सुकाणू समितीच्या व्यासपीठावर गोंधळ घालणार्‍या महिलेचे नाव आहे. इनामदार या मुंबईतल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. सुकाणू समितीची बैठक सुरु होताच त्यांनी स्टेजवर चढून घोषणाबाजी सुरु केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शेतकरी संप राजकारण विरहीत असल्याचे सांगितले जात असताना खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चु कडू व्यासपीठावर कसे असा प्रश्न एका महिला कार्यकर्तीने व्यासपीठावर माईकचा ताबा घेऊन केला. त्यामुळे गोंधळ उडला. सदर महिलेच्या माईकचा ताबा घेऊन तीला व्यासपीठावरून उतरवून देण्यात आले.

विरोधामुळे भाई जगताप व्यासपीठाखाली
या बैठकीत काँग्रेस नेते भाई जगताप यांना विरोध करणार्‍या शेतकर्‍यांची खासदार राजू शेट्टी यांनी समजूत काढली. शेतकर्‍यांच्या लढ्यासाठी जो देईल त्याचा पाठिंबा आपल्याला घ्यायचा आहे, गैरसमज करुन घेऊ नका, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले. मात्र लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे भाई जगताप यांना व्यासपीठाच्या खाली बसावे लागले.