शेतकर्‍यांचा सव्वा दोन लाख क्विंटल कापूस खरेदी

0

बाजार समितीचे सभापती सुनील पाटील यांची माहिती
शहादा: येथील बाजार समितीने तालुका पातळीवर कमी कालावधीत सर्व शेतकर्‍यांचा कापूस खरेदी करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. हंगामात बाजार समितीने सीसीआयच्या माध्यमातून आतापर्यंत दोन लाख तीस हजार क्विंटल कापसाची खरेदी केली असून त्यापोटी 124 कोटी रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केले आहेत.

लॉकडाऊनच्या काळातही शेतकर्‍यांची अडचण लक्षात घेऊन फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत समितीने सुमारे 52 हजार क्विंटल कापसाची खरेदी केली असल्याची माहिती सभापती सुनील पाटील यांनी दिली. केंद्राने चालू हंगामात कापसाचे दर पाच हजार 450 रूपये प्रति क्विंटल जाहीर केले होते. मात्र, हंगामाच्या सुरुवातीपासून बाजारात कापसाचे दर हमी भावापेक्षा कमी होते. त्यामुळे सीसीआयच्या मार्गदर्शक सूचनेनुसार येथील बाजार समितीने 15 नोव्हेंबरपासून तालुक्यातील शेतकर्‍यांची कापूस खरेदी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे शेतकर्‍यांना कापसाला योग्य किंमत प्राप्त होणार होती.

15 नोव्हेंबर ते कोरोनामुळे जाहीर झालेला जनता कर्फ्यू अर्थात 22 मार्च या चार महिन्यांच्या कालावधीत कापसाची खरेदी नियमित सुरू होती. या कालावधीत तालुक्यातील शेतकर्‍यांचा एक लाख 78 हजार पाचशे क्विंटल कापसाची खरेदी केली होती. त्यापोटी शेतकर्‍यांना 97 कोटीची रक्कम अदा केली आहे. तदनंतर कोविड-19 मुळे बाजारात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाल्याने कापूस खरेदी बंद झाली होती. शासनाच्या 17 एप्रिलच्या पत्रानुसार कोरोना संदर्भात विशेष काळजी घेऊन कापूस खरेदी करण्यास परवानगी दिली. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी संबंधितांची बैठक घेत करून आवश्यक ते मार्गदर्शन व सूचना दिल्या. जिल्हा उपनिबंधक अशोक चाळक यांनी तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे यांच्यामार्फत कापूस विक्रीसाठी शिल्लक असलेल्या दोन हजार 373 शेतकर्‍यांची यादी बाजार समितीस उपलब्ध करून दिली होती. उपलब्ध झालेल्या यादीनुसार बाजार समितीने 4 मे पासून प्रत्यक्षात कापूस खरेदी पुर्ववत सुरू केली. खरेदी सुरू असताना उपलब्ध यादीत काही नावे बोगस असल्याचे निर्दशनास आल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांनी 26 मे ला खरेदी केंद्रास दिलेल्या भेटीत समितीचे सभापती सुनील पाटील यांनी उपलब्ध असलेल्या यादीचा गावनिहाय तलाठींमार्फत पंचनामा करून देण्याबाबत विनंती केल्यावर जिल्हाधिकार्‍यांनी त्याचक्षणी जागेवरच पंचनामा करण्याबाबत तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना सांगितले.

संबंधितांचे पत्राद्वारे कौतुक
कापूस खरेदी दोन लाख तीस हजार क्विंटल झाली असून 124 कोटी रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात परस्पर जमा झाली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. भारूड, जिल्हा उपनिबंधक चाळक, उपविभागीय अधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार डॉ. कुलकर्णी व सहाय्यक निबंधक चौधरी यांनी वेळोवेळी खरेदी केंद्रास भेट देत मार्गदर्शन केले आहे. सीसीआयचे केंद्रचालक अरूण भाडाईत, श्रीजी कोटेक्सचे अजय गोयल व राधिका कॉटनचे कैलास पाटील यांनी खरेदीसाठी सहकार्य केले. कापूस खरेदी दरम्यान जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक नंदुरबार, उपविभागीय अधिकारी शहादा, तहसीलदार आणि सहाय्यक निबंधक, शहादा यांनी वेळोवेळी खरेदी केंद्रास भेटी देवुन मार्गदर्शन सूचना दिल्या. तसेच सीसीआय केंद्र चालक अरूण भाडाईत, श्रीजी कोटेक्सचे अजय गोयल व राधिका कॉटनचे कैलास पाटील यांनी खरेदीसाठी मेहनत घेतली. समितीचे सचिव व इतर कर्मचार्‍यांनी खरेदी कामी मेहनत घेतली. या सर्वाचे बाजार समितीचे मार्गदर्शक व संचालक दीपक पाटील व समितीचे सभापती सुनील पाटील यांनी अभिनंदन केले आहे. तसेच जिल्हाधिकार्‍यांनी विशेष पत्राव्दारे बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, सचिव संजय चौधरी व बाजार समिती व्यवस्थापन तसेच सीसीआयचे केंद्रचालक अरूण भाडाईत यांचे अभिनंदन केले आहे.