जळगाव। मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी विधानसभेत ,जर तुम्ही शेतकरी आत्महत्या करणार नाही अशी हमी घेत असाल तर शेतकर्यांना कर्ज माफी देतो असे वक्तव्य केल्याने जिल्हयातील शेतकरी 7/12 उतार्यावर आत्महत्या करणार नाही असे शपथपत्र लिहून कर्जमाफी मागणार आहेत. त्याबरोबर शेतकरी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी जिल्हयातील शेतकर्यांना एकत्रित करून जळगाव ते मंत्रालय पायीदिंडी काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार व डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच साताबारा गोळा करण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर स्वयंसेवक नेमण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत त्यांनी दिली.
वक्तव्य अवमान करणारे..
अस्मानी, सुलतानी संकटामुळे मागील 4-5 वर्षापासून शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पावेळी शेतकरी कर्जमाफी होईल असे चित्र असतांना देखील कर्जमाफीचा निर्णय झाला नाही. अधिवेशनाच्या सुरवातीपासून विरोधकांसह सत्ताधारी शेतकरी कर्जमाफीची मागणी करीत आहे. कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य शेतकर्यांसाठी अवमान करणारे आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आत्महत्येच्या हमी पेक्षा यावर्षी चांगला पाऊस, बि-बियाणे, खतांची हमी, विजपुरवठा वेळेवर मिळेल याची हमी द्यावी. तसेच पंतप्रधान मोदी उत्तरप्रदेशात कर्जमाफी देत आहे. तर महाराष्ट्रात काय अडचणी आहे असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला.
कर्जबाजारी शेतकर्यांचे साताबारा गोळा करणार
शेतकर्यांना आधार देवून भविष्यातील आत्महत्या रोखण्यासाठी त्यांना कर्जमाफी देवून त्यांचा सात बारा उतारा कोरा केला पाहिजे. म्हणजे येणार्या हंगामात त्यांना नव्याने उभे राहण्यास मदत होईल. मुख्यमंत्र्यांनी आत्महत्या न करण्याची हमी मागितली असून आम्ही त्यांनी दिलेलं आव्हान स्विकारत असल्याचे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले. आजपासून शेतकर्यांचे हमीपत्र त्यांच्याच सहीने शपथेवर लिहून सात बारा उतार्यावरील बोजा ,कर्जच्या नोंदिसाहित गोळा करून मुख्यमंत्र्यांना सादर करण्याचा मानस ठेवून जिल्ह्यातून कर्ज बाजारी शेतकर्यांचे सात बारा उतारे गोळा करण्याची मोहीम सुरु करण्यात आली. या बरोबरच जळगाव ते मंत्रालयापर्यंत हमीपत्र व सातबारा उतारा घेवून शेतकर्यांची पायदिंडी काढणार असल्याचीही माहिती राधेश्याम चौधरी व संजय पवार यांनी दिली.
या शेतकर्यांनी लिहून दिले शपथपत्र
मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील श्रीकृष्ण आधार पाटील, कुंदनपाटील, पितांबर रामदास सपकाळे, डिगंबर पितांबर चौधरी, गोपाल हरचंद चौधरी, ज्ञानदेव लक्ष्मण चौधरी, निंबा साहेबराव पाटील, शिवदास भगवान चौधरी, ज्ञानेश्वर रामा महाजन, गुलाबराव नथ्थु पाटील ह्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधी समोर सात बारा उतार्यावर शपथपत्र लिहून आत्महत्या न करण्याची हमी मुख्यमत्र्यांना लिहून दिले असल्याची माहिती डॉ. चौधरी दिली.
अडीच वर्षात सरकारकडून शेतकर्यांची चेष्टा
शेतकर्यांचा विचार न करता केंद्र सरकारने नोटबंदी केली. त्यामुळे शेतकर्यांना त्याचा मोठा फटका बसला. शेतकर्याला स्वत:चे कष्टाचे पैसे सुध्दा बँकेतून काढता येत नव्हते. याबरोबरच नोटबंदीमुळे शेतकर्यांना कमी भावात कापूस विक्री करावा लागला आहे. ब्रिटीशांच्या काळात शेतकरी लुबाडला गेले. यानंतर 70 वर्ष आघाडी सरकार असतांना शेतकर्यांना आपल्या पायावर उभे राहता आले नाही. 2014 मध्ये भाजप सरकार आल्यानंतर शेतकर्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता येईल अशी उमीद होती परंतू या भाजप सरकारने शेतकर्यांना उभे राहण्याचे स्वप्नच तोडले अशी खंत पत्रकाकर परिषदेत शेतकरी गुलाबराव नथ्थु पाटील यांनी मांडली. अडीच वर्षात या सरकारने शेतकर्यांची क्रुरचेष्ठा केली आहे. याबरोबर शेतकर्याला जगाचा पोशिंदा म्हंटले जाते परंतू शेतकर्याने पिकवलेल्या मालालाच किती हमी भाव मिळेल हे सुध्दा शेतकरी ठरवू शकत नाही. ज्वारी केंद्र नसल्याने मातीमोल किंमतीत ज्वारी विकावी लागली. या सरकारला शेतकर्यांबाबत मनशुध्दीकरण करण्याची गरज आहे असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
पिकांना कमाल हमीभाव मिळेल याची हमी देतील का?
कर्जमाफीकरीता मुख्यमंत्री हमी मागत असतील, तर त्यांनी देखील यंदा अवकाळी पाउस, गारपीट होणार नाही, दर्जेदार बि- बियाणे, खत उपलब्ध होतील, शेतीसाठी चोवीस तास वीज पुरवठा होईल, खासगी सरकार तगादा लावणार नाही, सर्व पिकांना कमाल हमीभाव मिळेल याची हमी देतील का? असा सवाल डॉ. चौधरी यांनी केली. आपण देखीलया वर्षी वेळेवर पाऊस पडेल याची गॅरेंटी देता का? यावर्षी दुष्काळ पडणार नाही याची गॅरेंटी देता का? यावर्षी अवकाळी पाऊस किंवा गारपीट पडणार नाही याची गॅरेंटी देता का? या वर्षी दर्जेदार व निर्भेळ बि-बियाणे तसेच खतं उपलब्ध होतील याची गॅरेंटी देता का? या वर्षी शेतीसाठी 24 तास वीज पुरवठा होईल याची गॅरेंटी देणार का? असा सवाल त्यांनी सरकारसाठी उपस्थित केला.
शेतकर्यांसाठी एकही आमदार राजीनाम देण्यासाठी तयार नाही. परंतू 288 आमदार पगारवाढीसाठी हातवर करतात. भाषणाच्या माध्यमातून शेतकर्यांचा कळवळा साध्य होत नाही. त्याबरोबर सरकारकडून शेतकर्यांची थट्टा केली जात असल्याचे मत जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार व्यक्त केला. यानंतर माहिती देतांना सांगितले की, कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील शेतकर्यांकडून सातबारा उतारा हमीपत्रासोबत मागविण्यात येवून ते मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोचविण्यात येणार आहे. तसेच शेतकरी क्रांती मोर्चा या माध्यमातून हजारो शेतकरी मिळून जळगाव ते मंत्रालयापर्यंत पायी दिंडी काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोहिमेत नोंदविण्याचे आवाहन
शेतकर्याला अर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने शेतकर्यांची पतमर्यादा ठरवली पाहिजे, शेतकर्याला बिनव्याजी कर्ज द्यायले हवे, हेक्टरी 1 लाख रुपये कर्ज द्यावे अशी मागणी संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच जिल्हयातील शेतकर्याचे कैवारी म्हणविणारे ना.महाजन, आ. खडसे, ना.गुलाबराव पाटील यांनी जिल्हयात कर्जमाफी करून दाखवावी असे आवाहन डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केली. तसेच ज्या शेतकर्यांच्या शेतीवर कर्ज असेल त्यांनी सातबारा उतारा व त्यामागे स्व-हस्ताक्षाराने मी मा. मुख्यमंत्री महोदयांनी मला कर्जमाफी दिल्यास मी आत्महत्या करणार नाही अशी शपथेवर हमी देतो असे लिहून सही करून जमा करावे, असे आवाहन राधेश्याम चौधरी यांनी केले असून यासाठी प्रत्येक तालुक्यावर स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत. त्यासाठी डॉ राधेश्याम चौधरी (9422771474) व संजय पवार (9665381010) यावर संपर्क साधावा.
पूर्ण कर्जमाफी द्या
जिल्ह्यांतील शेतकरी आत्महत्या करणार नाही अशी हमी शेतकर्यांकडून लिहून घेवून मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचेही डॉ. चौधरी यांनी यावेळी सांगितले. जगाचा पोशिंदा बळीराजाच्या कर्जमाफीवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य संतापजनक, विरोधी पक्ष काँग्रेस,राष्ट्रवादीने शेतकर्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी हि मागणी लावून धरलेली आहे. सेना व भाजपा आमदारांनी सुद्धा ह्या मागणीला समर्थन देत विधान भवन परिसरात घोषणा दिल्या आहेत. जर सर्व प्रमुख चार हि पक्षाचे आमदार एका मागणीवर सहमत आहेत तर मग घोडे कुठे अडते आहे असा प्रश्न डॉ. चौधरी यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारकडून नोट बंदी करण्यात आली मात्र, त्या कोणताही भ्रष्टाचार समोर आला. या नोटबंदीमुळे गरीब शेतकर्यालाच हाल सोसावे लागले असून त्यामुळे त्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी त्यांनी केली.