शेतकर्‍यांची कर्जमाफी आणि सत्ताधार्‍यांचे बेगडी प्रेम

0

मागील गेल्या काही दिवसांपासून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या प्रश्‍नावर राज्यातील भाजप सरकारवर विरोधकांकडून दबाव आणण्यासाठी संघर्षयात्रा काढण्यात येत आहे, तर दुसर्‍या बाजूला विदर्भ-मराठवाड्यातील प्रहार संघटनेकडून आसूडयात्रा काढण्यात आली. परंतु, राज्यातील भाजप सरकारकडून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगत सर्वांचीच बोळवण केली जात आहे. मात्र, भाजप सत्तेत आल्यापासून शेतकर्‍यांप्रति त्यांनी केलेल्या कामापेक्षा त्यांनी दाखवलेल्या बेगडी प्रेमाचीच चर्चा सर्वात जास्त रंगल्या आहेत.

यातील पहिल्या चर्चेची सुरुवात झाली ती राज्यात स्थानापन्न झाल्यानंतर तत्कालीन महसूल तथा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी केलेल्या वक्तव्यावरून. अवर्षणामुळे राज्यातील अनेक शेतकर्‍यांनी कृषिपंपाचे वीजबिल देयके भरली नव्हती. त्यामुळे खडसे यांनी शेतकर्‍यांना मोबाइलची बिले भरयला पैसे आहेत. मात्र, कृषिपंपाची वीजबिले भरायला पैसे नसल्याचा खोचक विधान एकच खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी खडसे यांच्या वक्तव्यावरून एकच गदारोळ उठत त्यांच्यावर टीकाही मोठ्या प्रमाणावर झाली.

राज्यात शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावरून सर्वच स्तरातून सहानभूतीची लाट असताना त्यांच्याप्रति केलेल्या अशा विधानांनी एकच खळबळ माजली. त्यातून सत्ताधारी भाजपला शेतकर्‍यांप्रति कोणतेच प्रेम नसल्याची टीकाही झाल्या. त्याच काही कालावधी लोटत नाही, तोच राज्याचे ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी शेतकर्‍यांच्या वीज वापराची बिले भरली नसल्याने महावितरणवर 10 हजार कोटींचा बोजा पडला असल्याचे जाहीर केले. मात्र, याच राज्यातील उद्योजकांकडे जवळपास 12 हजार कोटी रुपये थकबाकी असल्याबाबत चकार शब्द काढला नाही तसेच शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील थकबाकी लवकरात लवकर भरावी अन्यथा वीजजोडणी तोडण्याची घोषणा केली. त्यामुळे काही काळ त्याबाबत गदारोळ निर्माण होण्याची शक्यता दिसताच भाजपच्या नेहमीच्या यू टर्न घेण्याच्या सवयीप्रमाणे त्यांनीही वीजबिल भरण्यासाठी सवलत योजना जाहीर करत वीजजोडणी तोडणार नसल्याची घोषणा केली.

त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी कानपिचक्या दिल्यानंतर काही काळ शेतकर्‍यांच्या कोणत्याही प्रश्‍नांबाबत चकार शब्द कोणी काढला नाही. मात्र, राज्यातील तूर उत्पादक शेतकर्‍यांच्या तुरीचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला असताना राज्याचे विद्यमान कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी परदेश दौर्‍यावर गेले. त्यामुळे शेतकर्‍यांबाबत राज्यातील कृषिमंत्र्यांनाच आस्था नसल्याची टीका सर्वच प्रसारमाध्यमातून सुरू झाली. मात्र, त्यावर राज्याच्या मंत्रिमंडळातून कोणताही मंत्री फुंडकरांच्या मदतीला धावून आला नाही. याविषयीच्या वादाचा धुराळा खाली बसत नाही, तोच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तूर खरेदी करून तरीही साले रडतात, अशी टिपणी शेतकर्‍यांविषयी करत एकच खळबळ निर्माण केली. वास्तविक एखाद्या राजकीय नेत्याने जे संकटग्रस्त आहेत अडचणीत आहेत. त्यांच्याविषयी थेट शिवीगाळ करण्याचा कदाचित राज्यातला पहिलाच प्रकार असावा. दानवे यांच्या शिवीगाळीने राज्यातील विरोधकांबरोबरच सत्तेतील भागीदार असलेल्या शिवसेनेलाही हा मुद्दा आयताच मिळाला. त्यामुळे दानवे यांच्यावर एकच टीकेची झोड उठली. डोंबिवलीत तर दानवे यांच्या वक्तव्यावरून निदर्शने करण्याच्या मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला, तर दुसर्‍या बाजूला मनसेच्या एका कार्यकर्त्याने दानवे यांची जीभ छाटून आणणार्‍यास 10 लाखांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले.

अखेर विरोधकांबरोबरच राज्यातील सर्वच स्तरातून भाजप आणि प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्यावर टीकेचा भडिमार होऊ लागल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून होणार्‍या डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी तब्बल दोन दिवसांनी दानवे यांना खुलासा देण्यास भाग पाडले. मात्र, दानवे यांनीही स्वत:च्या शैलीत शेतकर्‍यांची माफी मागण्याऐवजी दिलगिरी व्यक्त करून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या दिलगिरीवर विरोधकांनी शांत राहण्यापेक्षा त्यांच्या राजीनाम्याच्या प्रश्‍नावर राज्यभरात आंदोलन करण्यास सुरुवात केली.

दानवे यांच्या या वक्तव्यामुळे एका बाजूला शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात लोकप्रिय होत असलेल्या भाजपला पुन्हा एकदा ओहोटी लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे त्यांना पदावरून दूर करणार का, की त्यांना कायम ठेवणार याबाबत भाजपमध्येच उत्स्ाुकता लागून राहिली आहे. भाजपचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर वादग्रस्त विधाने करणार्‍यावर कारवाई केल्याचे किंवा जाहीर समज दिल्याचे आतापर्यंत तर कधी पाहण्यात किंवा ऐकण्यात नाही.

आघाडी सरकारमधील मंत्रीही मागे नव्हते सध्या सत्तेवर असल्याने भाजपच्या नेत्यांची वक्तव्य वादग्रस्त आणि बेगडी प्रेमाची झाक दाखवून देत आहेत. मात्र, भाजपबरोबर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही शेतकर्‍यांप्रति वादग्रस्त विधाने केलीत. त्यातील एक विधान म्हणजे राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धरणात जर पाणीच नाही तर काय त्यात करून पाणी देऊ काय, असा सवाल करत शेतकर्‍यांना पाणी देऊ शकत नसल्याचे जाहीर केले होते. त्यावेळीही असाच गदारोळ माजून त्यांच्यावर एकच टीकेचा भडिमार झाला होता. एकंदरीतच राज्यातील राजकीय नेत्यांकडून कधी जाहीररीत्या तर कधी खासगीत बोलून शेतकर्‍यांविषयीचे बेगडी प्रेम कायमच दाखवून दिले आहे. मात्र, सत्य की अशा बेगडी प्रेमालाच शेतकर्‍यांनी भरभरून प्रेमही दिले आहे.

गिरिराज सावंत – 9833242586