शेतकर्‍यांची पिळवणूक

0

पुणे । राज्य सरकारकडून शेतकर्‍यांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. सरकारने शेतकर्‍यांची ही पिळवणूक थांबवून दुधाला प्रतिलिटर 27 रुपये दरासोबतच 6 रुपये अनुदान देण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे. इंदापूर तालुक्यातील युवा शेतकर्‍यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन शेतकर्‍यांच्या विविध समस्या सांगितल्या. त्यावेळी बोलताना पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, राज्यामध्ये 1 जूनपासून शेतकर्‍यांनी संप पुकारला आहे. शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी शेतकरी आंदोलनाला माझा पाठिंबा राहणार आहे. सध्या दुधाचे दर कमी झाले असल्यामुळे दुग्धव्यवसाय करणारा शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. दुग्ध व्यवसाय हा कष्टाचा व्यवयास असून, शेतकर्‍यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्यासाठी शासनाने दुधाला किमान 27 रुपये प्रतिलिटर दर देण्याबरोबरच अनुदानही जाहीर करावे, अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली.

शेतकर्‍यांनी कष्टाने पिकवलेल्या भाजीपाला कवडीमोल दराने विकावा लागत आहे. अनेक शेतकर्‍यांना भाजीपाल्याची काढणी करुन वाहतूक करणे परवडत नाही. परिणामी कष्टाने पिकवलेला भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकर्‍यांवर येत आहे. त्यामुळे या सरकारने भाजीपाल्यालाही हमीभाव देण्याची गरज असल्याचे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.