नंदुरबार । ‘मी कर्जमुक्त होणारच’ हा संकल्प फार्म भरून शेतकर्यांची व्यथा शासनासमोर मांंडण्याचे अनोखे आंदोलन शिवसेनेच्या वतीने केले जाणार आहे. यासाठी सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दि. 1 जुलै रोजी विधानभवनावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, नाशिक येथे झालेल्या मेळाव्यात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्त्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटुंबियांनी आपल्या भावना मांडल्याने आता आरपार लढाई सुरू करण्याचे धोरण शिवसेनेने आखले आहे.
शेतकर्यांकडून संकल्प फार्म घेतले भरून
त्यासाठी प्रत्येक कर्जबाजारी शेतकर्यांकडून फार्म भरवून घेतले जात आहेत. हे सर्व फार्म जमा करून ते सेनाभवनात पाठवले जातील. दि.1 जुलै रोजी सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून आलेल्या फार्मरूपी व्यथा घेवून विधानभवनावर मोर्चा धडकणार आहे. शेतकर्यांची ही आर्त हाक तरी शासनाला जागे करेल आणि कर्जमुक्तीची घोषणा होईलं, अशी अपेक्षा विक्रांत मोरे यांनी व्यक्त केली. देशाच्या पोशिंदा असलेल्या शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाकउे पैसा नाही, दुसरीकडे रस्त्यांच्या कामांवर करोडो रूपये खर्च करण्याची तरतूद शासनाकडे आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न वर्षानुवर्ष तसाच प्रलंबीत असून तो सोडविण्यास शासन उदासिन आहे. दुसरीकडे कोळदे ते खेतियापर्यंतच्या रस्त्यासाठी करोडो रूपयाचा निधी शासनने मंजूर केला असून त्याचे टेंडरही निघाले आहे. मात्र याच परिसरातील शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. या सार्या व्यथा मांडण्यासाठी शिवसेनेने एल्गार पुकारला आहे, असेही विक्रांत मोरे म्हणाले. यावेळी उपजिल्हाप्रमुख आमशा पाडवी जयप्रकाश परदेशी, मधुकर मिस्तरी, बापू चौधरी, अर्जुन मराठे, अनुप उदासी, उत्तम पाटील, डॉ.सांगर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.