पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासाठी पाण्याचा प्रश्न सोडविताना होतेय दमछाक
पिंपरी चिंचवड – धरणातील पाणी कधीच नळाला येत नसते. आंद्रा-भामा आसखेड धरणातून पुणे, पिंपरी-चिंचवडकरांसाठी पाणी आणण्यात येणार आहे. महापालिकेने बाधित शेतकर्यांच्या पुर्नवसनासाठी पैसे देखील दिले आहेत. परंतु, आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याची मर्यादित मुदत देता येणार नाही. अनेक अडथळे आहेत. शेतकरी न्यायालयात गेले आहेत. जागेचा प्रश्न आहे. असे अनेक अडथळे सोडविताना आमची दमछाक होत आहे. शेतकर्यांची सहमती घेऊन पवना बंद पाईपलाईन योजना पूर्ण केली जाईल, अशी माहिती पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा बापट यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, नगरसेवक नामदेव ढाके, राजेश पिल्ले, उमा खापरे, महेश कुलकर्णी, शैला मोळक, बाबू नायर, माउली थोरात, संजय मंगोडेकर आदी उपस्थित होते.
अनेक प्रश्न प्रगतीपथावर…
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणताना अनेक अडचणी येत आहेत. नव-नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. शेतकर्यांचे प्रश्न आहेत. त्यातून मार्ग काढताना दमछाक होत असल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले. पाण्याचा प्रश्न कायस्वरुपी सोडविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले. केंद्र, राज्य सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील 100 टक्के प्रश्न सोडविल्याचा आमचा दावा नाही. 60 ते 70 टक्के प्रलंबित प्रश्न सोडविले आहेत. मेट्रो, पालखी मार्ग, रिंगरोडचे काम सुरु असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. आगामी काळात उर्वरित प्रश्न देखील मार्गी लावले जातील.
आता त्यांच्याकडे उमेदवार नाहीत…
अजित पवार यांनी राज्यातील भाजप-शिवसेनेच्या काही जागा जाहीर केल्यानंतर तेथील उमेदवारांची नावे जाहीर करणार आहोत, अशी भूमिका घेतली आहे. यावर खासदार गिरीश बापट यांनी टोला लगावत आम्ही कोणाची वाट पाहणार नाही. आमची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर कोणी राहिले असतील ते तिकडे जातील तेव्हा राष्ट्रवादी पक्ष उमेदवारी जाहीर करेल, असे ते म्हणाले. अजित पवार हे पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यात 2 दिवसांपूर्वी म्हणाले होते की, महाराष्ट्रात भाजप, शिवसेना यांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर याबद्दलची भूमिका घेणार आहोत. त्यांनी आमच्यावर खेळी केली आहे. आपलेच उमेदवार घेऊन आपल्याच विरोधात उभे केले आहेत. त्यामुळे काट्याने काटा काढायचा आहे. त्यांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर समोर काय परिस्थिती आहे. कोणाला उमेदवारी दिल्यानंतर ताकदीने काम होईल आणि उमेदवार निवडून येऊ शकेल हे पाहिले जाईल. आपल्याला आपले सरकार आणायचे आहे, असे ते म्हणाले होते. या विषयीचा प्रश्न आयोजित पत्रकार परिषदेत खासदार बापट यांना विचारला तेव्हा ते म्हणाले की, आम्ही त्यांची वाट पाहणार नाही. आता त्यांच्याकडे उमेदवार नाहीत. आमची यादी जाहीर झाल्यानंतर कोणी राहिले असतील ते त्यांच्याकडे जातील. तेव्हा ती यादी जाहीर करतील. आमच्याकडे भरपूर उमेदवार आहेत ,असा टोला बापट यांनी लगावला होता.