धुळे । राष्ट्रीय महामार्ग क्र.6 च्या चौपदरीकरणासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा एकसमान मोबदला मिळावा, या मागणीसाठी धुळे तालुक्यातील मुकटीपासून नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पर्यंत शेतकरी रस्तावर उतरले. त्यांनी केवळ महामार्गाचे कामच बंद पाडले नाही तर शिस्तीत आपापल्या जमिनीवर ठिय्या आंदोलन करुन या प्रश्नाकडे लक्ष वेधले. शेतकर्यांनी केलेल्या अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले गेले. शेतकर्यांना एकसमान मोबदला मिळावा अशी रास्त मागणी शेतकरी करतांना दिसत होते. शेतकर्यांनी एकच मोबदला मिळावा यासाठी वेळोवेळी निवेदने देऊन पाहिले आहे. परंतु या निवेदनाचा काही एक उपयोग न झाल्याने शेतकर्यांनी हे अनोखे आंदोलन आपल्या कुटुंबासोबत केले आहे.
वाहतूकीला कोणताही अडथळा नाही
यासंदर्भात या आधी सर्व संबंधितांना निवेदने देवूून केवळ आश्वासनेच मिळाली. लोकप्रतिनिधींनी देखील याकडे दुर्लक्ष केले. म्हणूनच आज शेतकरी आपल्या कुटूंबासह चौपदरीकरणात गेलेल्या आपल्या मालकीच्या जमिनीवर ठिय्या आंदोलन करीत आहेत. शिवाय या शेतकर्यांनी चौपदरीकरणाचे सुरु असलेले कामही बंद पाडले आहे. विशेष म्हणजे, हे आंदोलन शेतकर्यांनी आपापल्या जमिनीवर केल्याने महामार्गावरील वाहतूकीला कुठल्याही प्रकारचा अडसर निर्माण झाला नाही. परिणामी, पोलिसांचीही धावपळ टळली. तालुक्यातील नेर, कुसूंबा, फागणे, मुकटी या ठिकाणी शेतकर्यांनी आंदोलन केल्याचे वृत्त आहे.
वेगवेगळा मोबदला
राष्ट्रीय महामार्ग क्र.6च्या चौपदरीकरणासाठी जमिन संपादन करतांना शासनाने मोबदला देतांना दोन वेगवेगळ्या पध्दती अवलंबिल्यामुळे शेतकर्यांवर अन्याय होत आहे. एकाच गावात बांधाला बांध असलेल्या जमिन संपादन करतांना एकाचा मोबदला जुन्या भूसंपादन कायद्यान्वये तर दुसर्याचा मोबदला नविन भूसंपादन कायद्यान्वये देण्यात येत असल्याने शेतकर्यांवर अन्याय होत आहे. म्हणूनच सर्वच संपादीत जमिनीचा मोबदला हा नवीन भूसंपादन कायद्यान्वये मिळावा, अशी शेतकर्यांची मागणी केली आहे.
कुटूंबियांसह शेतकर्याचां आंदोलनात सहभाग
या आंदोलनात संग्राम पाटील, शामकांत शिंदे, बाळु सोनवणे, राजेंद्र शिंदे, फकीरा चौधरी, संजय शिंदे, प्रफुल्ल शिंदे, गणेश शिंदे, उमेश चौधरी, पंकज खैरनार, नामदेव पाटील, विलासराव पाटील, अजय सुर्यवंशी, सुदाम महाजन, राजेंद्र शिंदे, गोकुळ खिवसरा, प्रदीप शिंदे, राजेंद्र पाटील, रमेश माळी, सदाशिव चौधरी, प्रकाश परदेशी, सुरेश परदेशी, पंढरीनाथ पाटील, अशोक शिंदे, शांताबाई परदेशी, इंदिरा परदेशी यांच्यासह शेकडो शेतकरी कुटूंबियांसह सहभागी झाले होते