शेतकर्‍यांचे आक्रोश आंदोलन मागे

0

यवत । दौंड तालुक्याच्या कानगाव येथील शेतकर्‍यांनी आपल्या विविध 11 मागण्यांसाठी 2 नोव्हेंबरपासून बेमुदत आक्रोश आंदोलन सुरू केले होते. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन 23 व्या दिवशी शुक्रवारी रात्री उशिरा मागे घेण्यात आले. तशी घोषणा शेतकरी कृती समितीने केली. दूध प्रश्‍न समिती नेमून एक महिन्यात सोडविणार, नवीन कांदा 15 व जुना 30 रुपये, तसेच मागील दोन कर्जमाफीमध्ये ज्या शेतकर्‍याला कर्जमाफी मिळाली नाही त्यांना प्राधान्य दिले जाईल. महागाईची व्याख्या ठरवण्यात येईल, शेतकरी पेन्शन योजना ही येत्या अधिवेशनात विचारधीन असल्याचे पटेल यांनी कानगाव येथे येऊन शेतकर्‍यांना सांगितले.

या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत मान्य केल्या आहेत, असे त्यांनी यावेळी जाहीर केले. मागण्या मान्य झाल्याने आंदोलन थांबविण्यात येत असल्याचे शेतकरी आक्रोश समितीच्या वतीने यावेळी जाहीर करण्यात आले. सरकारला ही एक संधी दिली पाहिजे, आंदोलन थांबले असले तरी ते संपले नाही, असे शंकरअण्णा धोंडगे यांनी यावेळी सांगितले. आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, वैशाली नागवडे, वासुदेव काळे आदी नेते याप्रसंगी उपस्थित होते.