नंदुरबार : शेतकर्यांच्या संपाचा पुढील टप्प्यात लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानांसमोर आंदोलन बुधवारी करण्यात आले. मात्र, या आंदोलकांना समोरे न जाता लोकप्रतिनिधींनी शहराबाहेर राहणे पसंत केल्याचे दिसून आले. यात सत्य शोधक कष्टकरी सभेच्या वतीने नंदुरबारच्या खासदार डॉ हिना गावित आणि आमदार विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी घेराव घालण्यात आला. शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.शेकडो कार्यकर्त्यांनी बंगल्या समोर ठिय्या मांडून घोषणा दिल्या.खासदार आमदार दोन्ही बाहेर असल्याने शेतकर्यांचे निवेदन घेण्यासाठी बंगल्यावर कोणीच नव्हते. त्यामुळे आंदोलकांनी व् नाराजी व्यक्त केली. आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी सकाळपासूनच पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.
लहान शहादा येथे रास्ता रोको
शेतकरी आंदोलनाची धग कायम असून काल सातव्या दिवशीही नंदुरबार तालुक्यातील लहान शहादा येथे शेतकर्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील वा वाहतूक ठप्प झाली होती. शेतकर्यांचे आंदोलन सुरूच असून काल सरकारी कार्यालयात टाळे ठोक आंदोलनाची हाक देण्यात आली होती. लहान शहादा गावाच्या रस्त्यावर बसून शेतकर्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. रास्ता रोकोकरून शासनाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात महिला शेतकर्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. पोलिसांनी या शेतकर्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून सोडून दिले.
शहाद्यात आंदोलनाने भाजीपाला आवक घटली
राज्यात शेतकर्यांच्या संप सुरुच आहे. मात्र शहरात काल मंगळवारचा आठवडे बाजाराला चांगला प्रतिसाद होता. कोणत्याही प्रकारचे व्यत्यय न येता शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरु होते. भाजीपाला मार्केटमध्ये नेहमीप्रमाणे वर्दळ सुरु होती. स्वाभिमान शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते फिरतांना दिसत होते. आज रोजी भाजीमार्केट मध्ये बाहेरुन येणार्या भाजीपाल्यांच्या गाड्या कमी प्रमाणात होत्या. मध्यप्रदेशातुन एकही वाहन आले नासल्याची माहिती दिली. शहादा शहरात इंदोर व खरगोन भागातुन भाजीपाला येतो तर नाशिक जळगाव भागातील गाड्यादेखील आल्या नाहीत. साक्री धूळे शिरपूर भागातील गाड्या आल्या होत्या. भाजीपाला मार्केटमध्ये काहीश्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचा किमतीत वाढ झाली आहे. नासिक भागातील गोदावरी कंपनीच्या व गुजरात राज्यातील निझर भागातुन सुमुल डेअरीच्या दुधाच्या गाड्या आल्याने दुधाची कमतरता भासली नाही. भाजीमार्केट नेहमीप्रमाणे सुरु होते. कृषीउत्पन्न बाजार समिती आवारात कोणत्याही प्रकारची शेतकर्याची वाहने आज आलेली नव्हती. पण धान्यविक्रेत्यानी दुकाने सुरु केल्या आहेत. धान्याची खरेदी बंद होती तर केवळ विक्री सुरु होती. उपाययोजना म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात पोलीस बंदोबस्त कायम आहे. मध्यप्रदेशात शेतकर्यांवर केलेल्या गोळीबाराच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी यांनी निषेध व्यक्त केला आहे.