शेतकर्‍यांचे राज्यभरात टाळेठोक आंदोलन

0

मुंबई । कर्जमाफीसाठी शेतकरी आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेतकरी संपाच्या सहाव्या दिवशी आज बारामतीच्या प्रशासकीय कार्यालयासमोर शेतकर्‍यांनी अनोखे आंदोलन केले. जागरण गोंधळ आंदोलन करत शेतकर्‍यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच संपूर्ण कर्जमाफीसह शेतमालाला हमीभाव देण्याची मागणीही यावेळी शेतकर्‍यांनी केली. सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. या वेळी 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

कोल्हापूर, नाशिकमध्येही टाळे
तर कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातील रायपूरमध्ये आंदोलकांनी तलाठी कार्यालयाला टाळे ठोकले आहे. कोल्हापुरातल्या शिये गावात रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने तलाठी कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्यभर सुरू असलेेल्या शेतकरी संपाचा परिणाम शहरांमध्ये जाणवायला सुरुवात झाली आहे. आज अहमदनगर जिल्ह्यात केवळ 1 टक्केच भाज्यांची आवक झाली आहे तर, दूधाचे संकलनच झाले नाही आहे. यामुळे नगरमध्ये आज लोकांची मोठी गैरसोय होताना दिसून आली. अमरावती आणि पुणतांब्यात शेतकर्‍यांचा रोष आजही पाहायला मिळाला. कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांच्या घरासमोरच भाजीपाला फेकून दिला. यामध्ये पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. तर तिकडे पुणतांब्यात सरकारचा दहाव्याचा विधी करून शेतकर्‍यांनी सरकारचा निषेध केला आहे. शेतकरी संपामुळे ग्रामीण अर्थकारण मोठ्या प्रमाणावर संकटात सापडल्याची प्रतिक्रिया नाशिक कांदा बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकरांनी दिली आहे. शेतकरी संपात ग्रामीण अर्थकारण संकटात सापडले आहे. 100 कोटींपेक्षा अधिकची उलाढाल थांबली आहे. तसेच शेतकरीच नाही तर हमाल, मापारी, वाहनचालकांचीदेखील रोजंदारी संपामुळे बुडाली आहे. 17 मोठ्या बाजारसमिती आणि 20 उपबाजार समितीत रोज होणारा 20 ते 25 कोटींचा भाजीपाला, कांदे व्यापार ठप्प झाला आहे. त्यामुळे भविष्यात निर्यातीवर आणि भावांवर परिणाम होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.