विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात आमदार हरीभाऊ जावळे यांची आग्रही मागणी
फैजपूर- विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून त्यात नियम 293 अन्वये दुष्काळ विषयावर उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेमधे रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार हरीभाऊ जावळे यांनी शेतकर्यांचे वीज बिल माफ करण्यासंदर्भात आणि कृत्रिम पाउस पाडण्या संदर्भात आग्रही मागाणी केली.
चिंतामुक्तीसाठी वीज बिल माफी गरजेची
सरकारच्या माध्यमातून गेल्या साडेचार वर्षात शेतकर्याना नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी कर्ज माफी, दुष्काळी मदत, बोंड अळीची मदत, विमा, कांदा अनुदान आणि आता शेतकरी सन्मान योजना या माध्यमातून मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे मात्र जून ते सप्टेंबर 2018 या कालावधी मध्ये सरासरी पेक्षा 40 ते 50 टक्के कमी पाउस झाला आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह इतिहासात पहिल्यांदाच रावेर-यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी परीस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे तालुक्याचे वैभव असलेली केळी पूर्णपणे संपलेली आहे. मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचे नुकसान झाले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड चिंतेत आहे. अश्या वेळी शेतकर्याना खर्या अर्थाने चिंता मुक्त जर करायचं असेल तर शेतकर्यांचे वीज बिल माफ केले पाहिजे या सोबतच दुष्काळावर उपाय योजना म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे सुद्धा केली आहे पण पाउसच पडला नाही तर त्याचा फायदा होणार नाही म्हणून महाराष्ट्रात जिथे पोषक वातावरण असेल तिथे सरकारने स्विकारलेल्या कृत्रिम पाउस पाडण्याच्या धोरणानुसार यावल-रावेर तालुक्यात कृत्रिम पाउस पाडावा आणि दुष्काळ निवारण करून दुष्काळाला भूतकाळात जमा करावा, अशी आग्रही मागणी हरिभाऊ जावळे यांनी केली आहे. दुष्काळी परिस्थितीवरील चर्चेत अश्या प्रकारची मागणी करणारे सकाळपासून हरीभाऊ जावळे हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार होते.त्यांच्या या मागणीचे महाराष्ट्रातील शेतकर्यांनी आनंद व्यक्त करून स्वागत केले आहे.