महाराष्ट्र विधीमंडळाने अखेर बहुमताने जीएसटी विधेयक मंजूर केले आहे. सोमवारचा दिवस काही प्रमुख घटनांनी गाजला त्यातील जीएसटी विधेयकाला मंजुरी ही एक घटना तर पुण्याच्या महात्मा फुले वाडा येथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेली आत्मक्लेश यात्रा ही दुसरी घटना. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून गुजरातच्या दौर्यावर निघाले आहेत. त्यांच्या या दौर्याला पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने आपल्या 50 कार्यकर्त्यांसोबत मुंडण करून कडाडून विरोध दर्शवला आहे. या घटनांचा शेतकर्यांशी, आरक्षणाशी आणि विकासाच्या पुढच्या टप्प्याशी संबंधित आहेत. महाराष्ट्रात मराठा आरक्षण तर गुजरातमध्ये पाटीदार समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा केंद्र सरकारच्या अवघड जागचे दुखणे होऊन बसला आहे.
शेतकर्यांच्या कर्जमाफी हा एक अत्यंत ज्वलंत आणि वेदनादायी प्रश्न गेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनानिमित्त पुन्हा एकदा ऐरणीवर आला. 25 आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचे अस्थिकलश घेऊन मुंबईत आलेल्या शेतकरी विजय जाधव यांना शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्याचे पडसाद रविवारी विधानसभेत उमटले. ‘शेतकर्यांना मंत्र्यांना भेटू दिले जात नाही. असे असेल तर शेतकर्यांनी मंत्र्यांना भेटूच नये, असा आदेशच राज्य सरकारने काढावा’, अशी मागणी करत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारवर संतप्त टीका केली, तर संबंधित प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेनेही केली. सांगली जिल्ह्यातील 25 आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या अस्थींचा कलश घेऊन वाळवा तालुक्यातील विजय जाधव हे कर्जमाफीसाठी मोटारसायकलवरून राज्यभर फिरत आहेत. शेतकरी वाचवा, कर्जमाफी करा, या मागणीसाठी त्यांनी अनेक लोकप्रतिनिधींची भेट घेतली. शनिवारी जाधव हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत आले होते. मंत्रालयासमोरील आकाशवाणी येथील आमदार निवासात ते थांबले होते. मात्र, मध्यरात्री 2.30च्या सुमारास त्यांना नरिमन पॉइंट पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रश्नाचे गांभीर्य सर्वच पक्षाला माहीत आहे. म्हणूनच सर्वजण आपण या प्रश्नावर संवेदनशील असल्याचे दाखवत आहे. दिवसेंदिवस शेतकर्यांची परिस्थिती खालावत चालली आहे. गेल्या चार महिन्यांत राज्यातील 852 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रात 132, कोकणात 1, पश्चिम महाराष्ट्रात 19, मराठवाड्यात 291, तर विदर्भात चक्क 409 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अत्यंत गंभीर परिस्थिती दर्शवणारी आकडेवारी आहे ही. जानेवारी 2017 ते एप्रिल 2017 या चार महिन्यांतील ही आकडेवारी आहे. नाशिकमध्ये शिवसेनेने आयोजित केलेल्या शेतकर्यांच्या परिषदेत आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबांच्या मंचावर व्यक्त झालेल्या वेदना अंगावर शहारे आणणार्या होत्या. हा असंतोष वाढतो आहे. याचे भान ठेवून सगळे मैदानात उतरले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी पुण्यातून महात्मा फुले वाडा येथून सोमवारी आत्मक्लेश पदयात्रा काढली. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, लक्ष्मी त्रिपाठी यांच्यासह विविध संस्था संघटनांच्या प्रतिनिधींनी पदयात्रेत सहभाग घेतला. आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या मुलेही दिंडी काढून पदयात्रेत सहभागी झाले. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जातील, शेतकर्यांच्या मालाला रास्त दर दिला जाईल, असे आश्वासन दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपला पाठिंबा दिला होता.
मात्र, एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. म्हणून ही आत्मक्लेश यात्रा असल्याचे राजू शेट्टी सांगत आहेत. खरे तर त्यांचा पक्ष सत्तेत सहभागी आहे. त्यांचा जनाधार हा शेतकरी आहे. जर तो तुटला तर त्यांची अवस्था अत्यंत वाईट होईल याची जाण त्यांना आहे. म्हणूनच त्यांचा हा आटापिटा सुरू आहे. भाजपही यातून मागे नाही. त्यांनीही शिवार संवादयात्रेची हाक दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संघर्षयात्रेला भाजपकडून संवादाने उत्तर दिले जात आहे. सरकारसाठी पक्षाचा सुयोग्य वापर करण्याचे संवाद यात्रा हे उत्तम उदाहरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी पक्षाचे पाठबळ मुख्यमंत्र्यांनी घेतले आहे. मुख्यमंत्री स्वत: उन्हातान्हात शेतकर्यांच्या बांधावर जात आहेत. मुख्यमंत्री तालुक्याच्या ठिकाणी आढावा बैठक घेणे सुरू केले आहे तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 45 डिग्रीच्या उन्हात शिवसंपर्क अभियान राबवले. काँग्रेस-राष्ट्रवादीही करीत नाही एवढी टीका ते मित्रपक्ष भाजपवर करत आहेत. एकूणच काय तर सत्ताधारी आणि विरोधीपक्षाच्या नेत्यांनाही शेतकर्यांच्या जनाधाराशिवाय तरुणोपाय नाही. म्हणूनच सर्वांची लगबग सुरू झाली आहे. राज्याच्या सत्तेवर बसण्यासाठी मतांची बेरीज त्याशिवाय पूर्ण होत नाही.