शेतकर्‍यांच्या नावावर 328 कोटींचे कर्ज उचलले

0

शेगाव/पुणे : तब्बल दहा हजार शेतकर्‍यांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून 328 कोटी रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याप्रकरणी गंगाखेड शुगर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यासह संचालक मंडळ, कर्मचारी आणि बँकेच्या अधिकार्‍यांविरूद्ध परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर हा अत्यंत गंभीर प्रकार चव्हाट्यावर आला असून, रासपचे अध्यक्ष तथा पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी मात्र डॉ. गुट्टे यांनी पाठराखण चालवली होती. साखर कारखान्याचे सभासद असणार्‍या शेतकर्‍यांच्या नावावर बनावट कागदपत्रांच्या आधारे 328 कोटी रुपयांचे कर्ज उचलले गेले आहे, तसेच नव्या योजनेत ते माफ ठरविण्याची प्रक्रियाही सुरु होती. याबाबतची फिर्याद गिरीधर सोळंके या शेतकर्‍याने दिली आहे.

बँकेचाही कर्जघोटाळ्यात सहभाग
पाच राष्ट्रीयकृत बँका आणि एका खासगी बँकेच्या अधिकार्‍यांशी संगनमत करुन रत्नाकर गुट्टेंच्या गंगाखेड शुगर अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड या खासगी साखर कारखान्याने सहा जिल्ह्यातल्या एकूण 10 हजार शेतकर्‍यांच्या नावे तब्बल 328 कोटींचे कर्ज उचलल्याचे समोर आले. त्यामध्ये बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांचाही समावेश आहे. या शेतकर्‍यांचे बोगस कागदपत्रे जोडून कर्ज घेतले गेले आणि त्यांना बँकांनीही साथ दिली. रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे पहिल्या फळीतील नेते आहेत. या पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे फलोत्पादन मंत्री महादेव जानकर यांनी मात्र गुट्टे यांची जोरदार पाठराखण केली. ते म्हणाले गुट्टे यांच्या मागे षडयंत्र रचल्या जात आहे. चौकशीअंती खरे ते बाहेर येईल आणि त्यानुसार कारवाई होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.