शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा : पी. साईनाथ

0

पुणे । शेतकर्‍यांचे प्रश्‍न हे केवळ शेतकरी वर्गापुरते मर्यादित नसून ते प्रश्‍न शहरी आणि ग्रामीण भागात राहणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे आहेत. जे शेतकरी त्यांचे संपूर्ण आयुष्य शेतीसाठी वाहून घेतात, त्यांच्या प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी निदान वीस दिवसांचे संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी आग्रही मागणी मॅगसेसे पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत पी.साईनाथ यांनी मांडली.

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे ज्येष्ठ समीक्षक आणि 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणांचा डॉ. ए.एन. माळी व आशुतोष भुपटकर यांनी अनुवादित केलेल्या ‘डॉयलॉग अ‍ॅन्ड डायलेक्टिक -अ सेक्युलर परस्पेक्टिव्ह’ या ग्रंथाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज झाले त्यावेळी साईनाथ बोलत होते.यावेळी सत्यजित तांबे, डॉ. पी.डी. पाटील, उद्धव कानडे, सचिन ईटकर, महेश थोरवे आदी उपस्थित होते. चेतक बुक्सतर्फे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

8 ते 25 कोटीपर्यंत शेतीकर्जे?
पी.साईनाथ म्हणाले, बँका अडचणीत यायला शेतकर्‍यांचे कर्जमाफी हे कारण पुढे केले जाते, परंतु आकडेवारी पाहिली असता शेतकर्‍यांच्या कर्जमाफी पेक्षा कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठमोठ्या उद्योगांना दिली गेलेली कर्जमाफी अधिक असल्याचे लक्षात येते. आज ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना कर्ज देण्याऐवजी मेट्रो शहरातील बँकांकडून आठ कोटी ते पंचवीस कोटीपर्यंत शेतीकर्जाच्या नावाखाली वाटली जात आहेत. अचंबित करणारी गोष्ट म्हणजे या बँकेच्या शाखा या मलबार हिलसारख्या शहरी चेहरा असलेल्या भागातील आहेत. या शेतीकर्ज वाटपामागचा धांडोळा घेतला असता ही कर्ज शेती कर्जाच्या नावाखाली शेती उत्पादन पूरक व्यवसाय करणार्‍या मोठमोठ्या कॉर्पोरेट उद्योगपतींच्या घशात घातली जात आहेत

अनुवादामुळे आज ते विचार सातासमुद्रपार
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सरकार विरोधी सर्व विचार दडपले जात आहेत. दाभोलकर, कुलबर्गी यांसारख्या विचारवंतांना तर बंदुकीच्या टोकावर कायमचे शांत करून टाकले आहे. सबनीसांनी त्यांच्या भाषणात शेतकरी, अल्पसंख्यांक, मुस्लिम, आदिवासी, भटके यांचे साहित्य प्रवाह मांडले असून अनुवादामुळे आज ते विचार सातासमुद्रपार गेले आहेत.

सर्वसमावेशक भाषण होऊ शकत नाही
डॉ. सबनीस म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात शेतकरी, अल्पसंख्यांक, मुस्लिम, आदिवासी, भटके यांच्या साहित्य प्रवाहाचे प्रतिबिंब उमटत नसेल तर ते भाषण सर्वसमावेशक भाषण होऊ शकत नाही. अध्यक्ष या नात्याने ती भूमिका प्रातिनिधीक होणार नाही. संवाद आणि संघर्षाचे सुत्र या भाषणात मी गुंफले होते. मी माझ्या भाषणात या प्रवाहांचा आढावा घेतला नसता तर ती सांस्कृतिक गुन्हेगारी ठरली असती.

कृषी संकट हे मानवनिर्मित
स्वामिनाथन आयोगाने केलेल्या शिफारशी लागू करू या आश्‍वासनावर सत्तेत आलेले हे सरकार पहिलीच शिफारस लागू करण्यात चालढकलपणा करीत आहे. सरासरी केवळ पाच ते सहा हजार महिन्याचे उत्पन्न असलेला शेतकरी कोणत्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहू शकणार आहे?, कृषी संकट हे नैसर्गिक संकट नसून हे मानवनिर्मित आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. दिवसेंदिवस शेतकर्‍यांची संख्या कमी होऊन शेतमजूरांची संख्या वाढत आहे. नुकत्याच केलेल्या काही पाहणीनुसार सरासरी दरोरोज दोन हजार शेतकरी शेती व्यवसायातून बाहेर पडत आहेत, हे चिंताजनक आहे. शेतकर्‍याची बँकेतील, समाजातील आणि त्यामुळे कुटुंबातील पत दिवसेंदिवस घटत असून शेतकरी हतबल झाला आहे, असे पी. साईनाथ यांनी खेदाने नमूद केले.