धुळे। उन्नत शेती- समृध्द शेतकरी अभियानाच्या माध्यमातून कृषी विभागाने शेतीतील अद्ययावत तंत्रज्ञान शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहोचवित, शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणावी. शेतकर्यांनी देखील एकाच पिकाचे उत्पादन न घेता मिश्र पीक पध्दतीचा वापर करावा, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे. शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालयात उन्नत शेती- समृध्द शेतकरी अभियानांतर्गत खरीप हंगामपूर्व तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिंदखेडा पंचायत समिती सभापती सुनंदा गिरासे, जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम, खंडू भिल, शिंदखेडा नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष दीपक देसले, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रकाश सांगळे, गट विकास अधिकारी सुरेश शिवदे, डॉ. बी. डी. जडे, यशवंत पवार, पंचायत समिती सदस्य दरबारसिंग गिरासे, डॉ. रोहित कडू उपस्थित होते.
नवे तंत्रज्ञान वापरा : शेतकर्यांनी नव- नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करत आणि मिश्र पीक पध्दतीचा वापर करीत उत्पादन वाढविले पाहिजे, असेही रावल म्हणाले. यावेळी डॉ.जडे यांनी कापूस लागवडीचे उच्च तंत्रज्ञान, डॉ. पंकज पाटील यांनी शेंद्रीय बोंड अळीचे व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कृषि अधिकारी मनिषा पाटील यांनी खरीप हंगामाच्या नियोजनाविषयी माहिती दिली. ड. प्रकाश पाटील यांनी पीक विमा विषयी यावेळी मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी पवार यांनी प्रास्ताविक सूत्रसंचालन करुन आभार मानले. यावेळी तालुक्यातील शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्पादन वाढीचा संकल्प करा
मंत्री रावल पुढे म्हणाले, खरीप हंगामा अगोदर शेतकर्यांना मार्गदर्शन व्हावे म्हणून गेल्या 13 वर्षापासून शिंदखेडा तालुक्यात अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. शिंदखेडा तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच सिंचन विहीरी देण्यात येत आहेत. आतापर्यंत 2,300 विहिरींचे कार्यादेश देण्यात आले असून आणखी 5 ते 6 हजार विहिरींचे नियोजन आहे. त्यामुळे तालुक्यातील सिंचन क्षेत्राचे प्रमाण वाढेल. शेतकर्यांच्या हितासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. अधिकार्यांनी संवेदनशील दाखवित या योजनांना गती द्यावी, जेणेकरुन शेतकर्यांना योजनांचा लाभ मिळू शकेल. शिंदखेडा तालुक्यात कृषी विभागाने किमान 25 टक्के उत्पादन वाढीचा संकल्प केला पाहिजे.
शेतकर्यांना मार्गदर्शन व्हावे
यावेळी मान्यवरांच्या हस्ते उन्नत शेती- समृध्द शेतकरी अभियान, गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन, पीक उत्पादन खर्च कमी व सर्वसाधारण उपाययोजना या विषयावर तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे व घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच जमिन आरोग्य पत्रिका, कांदा चाळ अनुदान धनादेश, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत 250 टन क्षमतेच्या गोदाम बांधल्याबाबत दोंडाईचा बाजार समितीला अनुदानाचा धनादेश, यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले.