शेतकर्‍यांच्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

मुंबई । संपूर्ण कर्जमाफीसहीत विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी सोमवारी राज्यभरात पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाशिक, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर आदी जिल्हांमध्ये शेतकर्‍यांची आंदोलने झाली. शेतकरी आक्रमक झाल्याने अनेक ठिकाणी जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेकीचे प्रकार घडले. नाशिक येथे फडणवीस सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच या बंदमुळे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले होते. त्यामुळे भाजीपाला, फळे, दूध व अन्य शेतमालाच्या वाहतुकीला मोठा फटका बसला.

गेल्या चार दिवसांपासून शेतकर्‍यांनी संप पुकारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कर्जमाफीचे ठोस आश्‍वासन मिळाले नसल्याने रविवारी नाशिकमध्ये झालेल्या शेतकर्‍यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मुख्यमंत्री सर्व मागण्या पूर्ण करत नाहीत तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार करत आणखी चार दिवस संप सुरूच ठेवण्याचा निर्णय शेतकर्‍यांनी घेतला. त्यानंतर, काही तासांतच नगरमधील वातावरण तापायला सुरुवात झाली. शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे पडसाद ठिकठिकाणी उमटले. नगरमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले, आंदोलनकर्त्यांनी वाहनांची जाळपोळ केली. उस्मानाबादमध्ये 5 एसटी बसेसवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. तर, हिंगोलीत मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संगमनेरमध्ये शेतकर्‍यांनी रास्ता रोको केल्याने नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. नागपूर तुळजापूर राज्य मार्गावर चक्काजाम करण्यात आल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. तसेच अहमदनगरमधील भाजी मार्केटमध्ये शुकशुकाट होता. भाजीपाला आला नसल्याने अडते, व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवली होती. मनमाड, मालेगाव आणि चांदवडमध्ये बंदला उत्तम प्रतिसाद लाभला. तर, पुणतांब्यात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. धुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद होत्या. रामटेक शहरात भाजप व शिवसेना कायकर्त्यांमध्ये हॉटेल बंद करण्यावरून सकाळी 11 वाजताच्या सुमारास वाद निर्माण झाल्याने तसेच भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेवक बिकेंद्र महाजन यांना जबर मारहाण केल्याने पोलिसांना नाईलाजास्तव लाठीमार करावा लागल्याचा प्रकार घडला. दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनीही बंदला मोठा प्रतिसाद दिला. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बंदला मोठा प्रतिसाद लाभला.

सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
नाशिक जिल्ह्यातील वडांगळी येथे आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी फडणवीस सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर चांदवड येथे संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकर्‍यांचा महाराष्ट्र बंदला उर्त्स्फुत प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला. लासलगाव-चांदवड रस्त्यावर शिवसेनेच्या वतीने रास्तारोको करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे पंचायत समितीचे सदस्य शिवा सुराशे यांच्यासह 5 ते 6 शेतकर्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. लासलगाव, चांदवड, ठेंगोडा येथील व्यापार्‍यांनीही दुकाने 100 टक्के बंद ठेऊन संपला पाठिंबा दर्शवला आहे. तर नांदूर शिंगोटे, भोजापूर खोरे, दोडी, दापूर, मानोरी इत्यादी भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच नाशिकमधील इंटरनेट सेवा बंद पडली होती. सांगलीत फडणवीस आणि सदाभाऊ खोत यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळण्यात आले.

एरंड गावात सामूहिक मुंडण
एरंड गावातील शेतकर्‍यांनी सामूहिक मुंडण करत रास्ता रोको आंदोलन केले. तर देशमाने येथील शेतकर्‍यांनी सकाळी 7 वाजता गावातील घरांमध्ये दुधाचे मोफत वाटप करत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. तसेच शेतकर्‍यांनी व ग्रामस्थांनी गावातील गणपती मंदिरासमोर जमून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा जाहीर निषेध केला. तसेच दिंडोरी शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी बंदला उर्त्स्फुत प्रतिसाद मिळत असून गावोगावातील व्यवहार बंद आहेत. काही गावांत रास्ता रोको केले.

सातारा हायवेवर जाळपोळ
सातारा शहरात संपाचे तीव्र पडसाद उमटले. पुणे-बंगळुरू हायवेवरील उडतारे गावाजवळ आंदोलनाला हिंसक वळण लागले. टायरसहीत इतर वस्तू जाळून वाहने रोखण्यात आली. शेतकर्‍यांच्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. बाजारपेठेतील कपड्यांची दुकाने बंद होती. काही मिठाई आणि बेकरी दुकानांचे अर्धे शटर उघडले होते. त्यातून अत्यावश्यक वस्तू खरेदी करताना सातारकर दिसत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे व मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाही काढण्यात आला. सत्ताधार्‍यांविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. या मोर्चात विविध संघटना आणि पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संवेदनशील ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

राजकीय पक्षांनी दिला पाठिंबा
शेतकर्‍यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, किसान सभा, छावा संघटना आदी पक्ष व संघटना सहभागी झाल्या होत्या.

दूध टँकर झेड सुरक्षेत
शेतकर्‍यांनी अनेक ठिकाणी दुधाचे टँकर आणि भाजीपाल्याच्या गाड्या रोखून धरल्या होत्या. मुंबईत दुधाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरून निघालेल्या 27 दूध टँकर्सला झेड सुरक्षा पुरवण्यात आली होती. पोलिसांच्या ताफ्यात दुधाचे टँकर पुण्याहून मुंबईला पोहचले. तर, कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील सात दूध संघाचे टँकर मुंबईकडे रवाना झाले. राज्याच्या दूध उत्पादनाच्या 50 टक्के दुधाची मुंबईची मागणी आहे. चार दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या संपामुळे मुंबईतील दुध 30 टक्के कमी झाले आहे. त्यामुळेच पोलीस बंदोबस्तात टँकर मागवण्यात आले.

खरा शेतकरी कोण? – मुख्यमंत्री
राज्यातल्या अनेक शेतकरी संघटनानी आजच्या शेतकरी संपात सहभाग दर्शवला असतानाच शेतकर्‍यांच्या नावाखाली कुणी राजकारण करत असेल तर त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात येणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. सह्याद्री अतिथिगृहात शीतपेय प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे.

राज्यातल्या विविध शेतकरी तसेच सामाजिक संघटनानी एकत्रितरित्य शेतकर्‍यांचा संघर्ष टोकाला नेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच या संघटनानी शेतकर्‍यांच्या आंदोलनांबाबत 21 शेतकरी नेत्यांच्या सुकाणू समितीची घोषणा करण्यात आली आहे. या नंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची असून आता मुख्यमंत्री कुणाकुणाशी चर्चा करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. सरकारने अल्पभूधारक शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार या निर्णयाबाबत कटिबध्द आहे. या व्यतिरिक्त सरकार अजूनही शेतकर्‍यांशी चर्चेला तयार आहे. मात्र शेतकर्‍यांच्या आड राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडवणे, तसेच या विषयाचे राजकारण करणार्‍यांच्या सोबत सरकार कदापि चर्चा करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

खर्‍या शेतकर्‍यांशी चर्चा करणार
महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने आपण अजूनही चर्चेला तयार असून खर्‍या शेतकर्‍यांशी चर्चा करू. राजकारण करू पाहणार्‍याशी चर्चा करणार नाही, असे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले. मात्र आता खरा शेतकरी कोण आणि तो कोण ठरवणार अशी चर्चा या निमित्ताने रंगू लागली आहे.