शेतकर्‍यांच्या मागणीनुसार दिले दुसरे आवर्तन

0

चाकण : खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणातून भामा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असून या पाण्याचा फायदा शेतकर्‍यांना शेतीसाठी व गावच्या पाणीपुरवठा योजनांना होणार आहे. सध्या धरणात 36% टक्केच पाणीसाठा असल्याने पुढील मे महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक वाढणार असून पाणीटंचाई निर्माण होऊ नये याकरिता धरणातील पाणीसाठा शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.

शेतकर्‍यांची मागणी
रब्बीच्या हंगामातील पिकासाठी पाणी सोडण्याची मागणी खेड, शिरूर, दौंड या तालुक्यातील शेतकर्‍यांनी करंजविहिरे येथील भामा आसखेड सिंचन व्यवस्थापन उपविभाग कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली होती. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार पुन्हा एकदा येथील धरणातून मंगळवार (दि.11 ) दुपारनंतर धरणाचे आयसीपीओमधून 900 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. परंतु धरणात पाणीसाठा कमी शिल्लक असल्याने यापुढे नदीपात्रातून पाणी सोडल्यास मोठी पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. कारण या धरणातून औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांसह चाळीस गावांसाठी पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच धरण परिसरातील वरच्या भागातील गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. धरणाच्या पूर्व भागात पाणी पुरवठा मुबलक प्रमाणात होत असतो.

या पिकांना जीवदान
शेतकर्‍यांच्या मागणीनुसार यापूर्वी धरणातून एक आवर्तन रब्बी हंगामासाठी सोडले होते त्यानंतर हे दुसरे आवर्तन आहे. सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पिकांना जीवदान मिळणार असून शेती फुलणार आहे. उन्हाळ्यात देखील शेतकर्‍यांच्या पिकांना धरणातून पाणी सोडले जाणार असल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. सध्या रब्बीच्या हंगामात शेतकर्‍यांनी आपल्या शेतात फ्लॉवर, कोबी, काकडी, पावटा, वांगी, पालक, कोथंबिर, मेथी, भोपळा, भेंडी, गाजर, टोमॅटो, मुळा आदी तरकारी भाजीपाल्यासह गहू, हरबरा, ज्वारी, मका आदी पिकं घेतले असून उन्हाळी बाजरी, भुईमूग पीक घेण्यासाठी लगबग सुरू केली आहे. धरणाचे पाणी उपलब्ध असल्यामुळे अनेक नदी काठच्या शेतकर्‍यांनी फुलांचे मळे देखील बहरले आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा फायदा खेड, शिरूर व दौड तालुक्यातील शेतकर्‍यांना होत आहे.

इतका आहे जलसाठा
बुधवारी धरणातील पाण्याची पातळी 660.20 मीटर असून एकूण पाणीसाठा 93.250 दलघमी आहे. तर धरणात उपयुक्त पाणीसाठा 79.728 दलघमी असून धरणात एकूण पाणीसाठा 36.72 टक्के इतकाच आहे.