पुणे । पुण्यामध्ये मराठवाडा विदर्भासह राज्याच्या कानाकोपर्यांतून शिक्षण घेण्यासाठी शेतकर्यांची मुले येतात. अनेकदा आर्थिक परिस्थिती नसतानाही कर्ज काढून शिक्षणासाठी डोनेशन देणे त्यांना भाग पडते. काही वेळा आर्थिक बाजू कमकुवत असल्याने अन्यायही सहन करावा लागतो. त्यामुळे प्रथमत: शेतकर्यांच्या गरजू विद्यार्थ्यांना संरक्षण देण्याचे काम रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून पुणे शहर व जिल्ह्यांमध्ये हाती घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य युवक अध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर यांनी दिली.
यावेळी मराठवाडा अध्यक्ष रामजीवन बोंदर उपस्थित होते. रयत क्रांती संघटनेच्या मुख्य कार्यकारिणीची बैठक पुण्यामध्ये नुकतीच पार पडली. त्यामध्ये सुरेश पाटील, दीपक भोसले, भानुदास शिंदे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.अॅड. जाधवर म्हणाले, शेतकर्यांच्या मुलांना शैक्षणिक संरक्षण देण्याकरीता वैयक्तिकरित्या किंवा संघटनेच्या कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांची तक्रार आल्यास ती त्वरीत सोडविण्याकरीता पुढाकार घेण्यात येणार आहे.