शेतकर्‍यांच्या मुलांनी राजसत्ता हाती घेण्याची आवश्यकता

0

बोदवड । शेतकर्‍यांच्या मुलांनी राजसत्तेसह मनोरंजन, चित्रपट, संगीत, तसेच आपल्यामधील आवडत्या कला, कौशल्याची धमक दाखवून प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्‍वासाने वावरावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात संवाद दौर्‍यानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. खेडेकर हे संपूर्ण महाराष्ट्रात संवाद दौरे करीत आहे. त्यानिमित्त त्यांनी बोदवड येथे भेट दिली.

रोजगाराची साधने स्वत:च तयार करा
याप्रसंगी पुढे बोलतांना ते म्हणाले की, सहकार क्षेत्र, सरकार क्षेत्र आणि खाजगी क्षेत्रात यापुढे कोणत्याच प्रकारची सवलती राहणार नाही. त्यामुळे एखादे सरकार येईल व आमचा उध्दार करेल, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहेे. खुल्या अर्थव्यवस्थेमुळे जागतिक अर्थकारणाचे नियम दररोज बदलत आहे. याचा सर्वसामान्यांना फायदा होण्याऐवजी तोटाच होत आहे. आता यापुढे तरुणांना स्वतःच्या रोजगाराची साधने स्वतःच तयार करावी लागतील. जागतिकीकरणामुळे शेती व्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मुलांना शिक्षणाची, लग्नाची अशा समस्या निर्माण झाल्या आहे. तसेच विधवा विवाहाच्या समस्या निर्माण झाल्या आहे. याबाबतीत तोेेडगा काढण्यासाठी मराठा सेवा संघ प्रत्येक तालुक्यात जावून मार्गदर्शन करीत आहे, असे खेडेकर यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल पाटील, मराठा सेवा संघ जिल्हा सचिव संजय पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस निरीक्षक संतोष पाडर, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष रोशन पाटील, निवृत्ती ढोले, गणेश पाटील, डॉ. येलवाडे, डॉ. चेतन महाजन, प्रदिप सुकाळे, पोलीस पाटील शुभम सोनवणे, योगीराज ढोले आदी उपस्थित होेेते.