पिंपरी-चिंचवड : शेतकर्यांच्या समस्या, प्रदूषण, ग्रामीण भागातील बेरोजगारी या तिन्हींवर ‘इथेनॉल’ हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे आगामी काळात इथेनॉल निर्मितीवर मोठ्या प्रमाणात भर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे हजारो कारखाने गावोगावी येतील. त्यातून ग्रामीण भागातील लोकांचा रोजगाराचा प्रश्न सुटेल. तसेच मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होऊन पर्यावरण सुधारेल, असा विश्वास केंद्रीय परिवहन व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी भोसरीत व्यक्त केला. भोसरी येथे सीआयआरटी (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ) आयोजित ‘इथेनॉल एक इंधन’ कार्यशाळेचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब एनके पाटील, खासदार अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव पाटील, अमर साबळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे आदी उपस्थित होते.
यंदा 500 कारखान्यांतून इथेनॉल निर्मिती
‘यंदा उसाचे उत्पादन चांगले आहे. यामुळे इथेनॉलचे उत्पादन चांगले होऊ शकते. एक टन भाताच्या तुसापासून 280 लीटर इथेनॉल तयार होते. 500 साखर कारखान्यांतून उसाच्या चिपाडापासून इथेनॉल निर्मिती करतील असे सांगत गडकरी म्हणाले, भारत सरकारने बांबूला ‘गवत’ म्हणून मान्यता दिली आहे. बांबूचे अनेक उपयोग आहेत. त्यापासून शर्ट देखील चांगले होतात. बांबूची भाजी, बांबूपासून हजारो हेक्टर मोकळ्या जमिनीवर बांबूची लागवड करून त्यापासून देखील इथेनॉल बायो सेकंड जनरेशन तयार करू शकतो. हे इथेनॉल विविध ठिकाणी उपयोगात आणू शकतो. इथेनॉलचे उत्पादन वाढेल सेकंड जनरेशन इथेनॉल फायदेशीर ठरेल आणि साखर कारखाने वर्षभर चालू राहातील आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होईल. उस शेतीबरोबरच बाबूंच्या शेती करण्यावर भर दिला गेला पाहिजे. टीव्हीएस कंपनीने फेक्स इंजिनची मोटर सायकल बाजारात आणली आहे. ही पेट्रोल आणि इथेनॉल अशा दोन्ही इंधनावर चालू शकते.
30 नदीजोड प्रकल्प
येत्या 2 वर्षात 18टक्के जमिनीला जलसिंचन करून कॅनॉल ऐवजी पाईपने पाणीपुरवठा केला जाईल. यामुळे 3 टक्के पाणी वाचेल. सध्या 30 नदीजोड प्रकल्प कार्यरत आहेत. यामुळे देशातील पाणी प्रश्न सुटेल. तसेच इथेनॉलच्या वापरामुळे पर्यावरण प्रश्न सुटेल आणि पैसेही वाचतील. ग्रामीण भागातील रोजगार, शेती, पर्यावरण या सर्वांसाठी उपलब्ध सर्व पर्यायांवर प्रयोग करून पाहणार आहे. मुंबईची बेस्ट 110 रुपये किलोमीटर, नागपूर एसी बस 78 रुपये किलोमीटर चालते आणि 60 रुपये किलोमीटर चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पैशाची बचत होऊन पर्यावरण देखील सुधारेल, असा ठाम विश्वास व्यक्त करीत सर्व मंत्री या सर्व योजनांना गती देतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
एनडीए काळात इथेनॉल निर्मितीवर भर : प्रधान
पेट्रोलियम मंत्री प्रधान म्हणाले, युपीए सरकारच्या काळात इथेनॉलची निर्मिती अत्यंत कमी प्रमाणात केली जात होती. एनडीएचे सरकार आल्यावर इथेनॉल निर्मितीवर भर दिला. त्याचा वापर परिवहन मध्ये करण्यास सुरुवात केली. याचे संपूर्ण श्रेय नितीन गडकरी यांचे आहे. देशात दिवसाला तीन हजार करोड लीटर पेट्रोलची विक्री होते. त्यातुलनेत इथेनॉलची निर्मिती होत नाही. इथेनॉलची जास्त निर्मिती केल्यास पेट्रोलची विक्री कमी होईल. त्यामुळे प्रदुषण कमी होईल. देशात मका या पिकाचे उत्पादन जास्त घेतले जाते. त्यापासून देखील इथेनॉली निर्मिती केली जावू शकते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. इथेनॉल निर्मितीबाबत पेट्रोलियम मंत्रालय गंभीर आहे. सहा हजार करोड लिटर इथेनॉल खरेदी करण्याचा करणार आहे. त्याबाबतच नवीन धोरण लवकरच तयार करण्यात येईल. मंत्रीमंडळाची मान्यता घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाईल.