शेतकर्‍यांच्या समृध्दीसाठी शासन प्रयत्नशील

0

धुळे । शेतकरी या राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्याचे जीवन सुखी आणि समृध्द होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेती व्यवस्थापनात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य शासन शेतकर्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी येथे केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त 1 मे रोजी सकाळी पोलिस कवायत मैदानावर मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ झाला. पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते, महापौर कल्पना महाले, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समिती सभापती मधुकर गर्दे, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा नियोजन अधिकारी एम. आर. वाडेकर, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

13 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा : पालकमंत्री भुसे म्हणाले, सद्यस्थितीत जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. टंचाई परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक जलसाठा आरक्षित करण्यात आला असून आतापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी 88 विहिरी अधिग्रहित केलेल्या आहेत, तर 13 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना, राज्य शासन पुरस्कृत शबरी व पारधी आवास योजना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, धुळे अंतर्गत राबविण्यात येत असून मार्चअखेर 9 हजार 120 पात्र लाभार्थ्यांना ऑनलाइन मान्यता देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यात धुळे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे, असेही त्यांनी नमूद केले. पर्यटन विकासाठी सुमारे 3 कोटी 40 लक्ष रुपयांचा निधी वितरीत केला आहे. तसेच आगामी पावसाळ्यात 8 लाख रोपांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले असून नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवावा, असेही आवाहन पालकमंत्री भुसे यांनी यावेळी केले. त्यांनी संचलनाची पाहणीही केली.

साबांविच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण
सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या काही महिन्यांपासून बांधकाम करीत उभारलेल्या आकर्षक प्रवेशद्वाराचे आज महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून अधिकार्यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या साक्रीरोडवरील प्रशासकीय कार्यालयाचे प्रवेशद्वार हे जुनाट पध्दतीचे असल्याने ते आकर्षकरित्या उभारले जावे, अशी चर्चा अधिकारी वर्गात होत होती. त्या अनुषंगाने शाखा अभियंता धर्मेद्र झाल्टे यांनी एक डिझाईन तयार करुन ते वरिष्ठांपुढे सादर केले. त्यानुसार प्रवेशद्वार तयार झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला देखणे रुप प्राप्त होईल. यासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावाही केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी देखील शाखा अभियंता धर्मेद्र झाल्टे यांच्या संकल्पनेला मूर्त रुप देण्यासाठी बिल्डींग मेटेन्सस फंडातून निधी उपलब्ध करुन दिला. परिणामी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आकर्षक प्रवेशद्वाराची उभारणी करण्यात आली. यावर बांधकाम विभाग या नावासह रस्तेकामाचे ट्रेडमार्क असलेल्या रोडरोलरची प्रतिकृती तयार करण्यात आल्याने या प्रवेशद्वाराची देखनीयता वाढली आहे. महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ध्वजवंदनानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सी.डी.वाघ याच्या हस्ते या प्रवेशद्वाराची फित कापून ते वापरासाठी खुले करण्यात आले.यावेळी कार्यकारी अभियंता विनोद भदाणे,भोसले,उपअभियंता सुभाष सूर्यवंशी,एस. एस.पाटील, अहिरे यांच्यासह ही संकल्पना मांडणारे शाखा अभियंता धर्मेद्र झाल्टे, बांधकाम विभागातील शाखा अभियंता व कर्मचारी उपस्थित होते.

व्यक्ती व संस्थांचा गौरव
परेड कमांडर तथा पोलिस उपअधीक्षक हिम्मतराव जाधव, सेकंड परेड कमांडर तथा राखीव पोलिस उपनिरीक्षक गोरख मन्साराम शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली संचलन करण्यात आले. या संचलनात राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6, पोलीस मुख्यालय, धुळे आरसीपी पथक, पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे, धुळे जिल्हा पोलीस दल, धुळे जिल्हा आरटीओ पथक, धुळे जिल्हा गृहरक्षक दलाचे पथक (महिला व पुरुष) सहभागी झाले होते. तसेच कृषी विभाग, जिल्हा परिषदेचा स्वच्छता विभाग व सामाजिक वनीकरण विभागाचे प्रबोधनपर रथ सहभागी झाले होते. शेवटी शाहीर गिरमकर व त्यांच्या सहकार्यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. जगदीश देवपूरकर, वाहीद अली सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध शासकीय उपक्रमांतर्गत उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्ती व संस्थांचा गौरवही करण्यात आला.