एरंडोल । शेतकर्यांसाठी शासनाने स्थापन केलेल्या स्वामिनाथन समितीच्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी खडके खुर्द येथे महाराणा चौकात झालेल्या विशेष ग्राम सभेत करण्यात आली. खडके खुर्द, खाद्केसिम, गणेशनगर ग्रामपंचायत व परिसरातील शेतकर्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष ग्रामसभेत पंचवीस ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
पुढील वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करण्याचे आवाहन
या विशेष ग्रामसभेत बळीराजा खान्देश शेतीमाल हमीभाव व कर्जमुक्त संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. तसेच शासन जोपर्यंत स्वामिनाथन समितीच्या शिफारशी मंजूर करत नाही. तोपर्यंत खडके खुर्द, खाडकेसिम, गणेश नगर या गावांसह परिसरातील शेतकरी पुढील वर्षापासून जीवनावश्यक वस्तूंची पेरणी करणार नाही असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. स्वामिनाथन समितीच्या शिफारशी मंजूर करण्यासाठी पुढील वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करून सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
एकजूट अभियान राबविणार
देशपातळीवर अखिल भारतीय किसान जागृती व एकजूट अभियान राबविणार असल्याचे कोअर कमिटीचे सदस्य आनंदा पाटील, राजेंद्र पाटील, मानसिंग पाटील, मनोहर पाटील, विकास पाटील, घनश्याम पाटील, हरचंद वंजारी, गणपत वंजारी, हरी जोगी, मोहनसिंग पाटील यांनी जाहीर केले. ग्रामसभेत अनेक महिला व पुरुष शेतकर्यांनी मनोगत व्यक्त करून शेतकर्यांच्या व्यथा मांडल्या.
ग्रामसभेत मांडल्या व्यथा
ग्रामसभेत लहान मुलांनी व्यक्त केलेल्या मनोगतामुळे उपस्थित ग्रामस्थ भारावून गेले होते. सभेत संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, शेतीमालाच्या हमिभावात वाढ करावी, शेतकर्यांना तीन हजार रुपये निवृत्तीवेतन देण्यात यावे,शासनाने राज्य कृषी मुली आयोगाची स्थापना लवकर करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य ठराव एकमताने मंजूर करून ते शासनाकडे पाठविण्यात आले. राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. घनश्याम पाटील यांनी प्रास्तविक केले तर सरपंच आनंदा पाटील यांनी आभार मानले. सभेस शेतकर्यांचा विशेषत: युवकांचा व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.