भुसावळ। शेतकर्यांना कर्ज मिळवणं सोपं व्हावं यासाठी किसान क्रेडिट कार्ड ही उपयुक्त योजना शासनाने आणली आहे. शेतकरी बँकेकडून एटीएमप्रमाणे किसान क्रेडिट कार्ड मिळवू शकतात. घेतलेल्या कर्जाचे पैसे लागतील तसे शेतकर्यांना वापरता येतात. शेतकर्यांना त्यांचे शेतीसाठीचे खर्च आवश्यकतेनुसार भागवता येणं, हा या योजनेमागचा मुख्य हेतू असल्याचे प्रतिपादन पंचायत समिती सभापती सुनिल महाजन यांनी केले.
यांची होती उपस्थिती
येथील स्टेशन रोडवरील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत कर्जदार शेतकरी सभासदांना किसान क्रेडिट कार्डाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्या प्रिती पाटील, माजी उपसभापती मुरलीधर पाटील, विभागीय उपव्यवस्थापक सुहास सोनवणे उपस्थित होते.
शेतकर्यांच्या गरजा पुर्ण होणार
यावेळी उपव्यवस्थापक सुहास सोनवणे यांनी रुपी कार्डचे महत्व तसेच कॅशलेस व्यवहार विषयी माहिती दिली. हे कार्ड कुठल्याही बँकेच्या एटीएमवर वापरता येणार आहे. खते, बियाणे खरेदी करणे यामुळे सोयीचे होईल. किसान क्रेडिट कार्ड योजनेचा उद्देश शेतकर्यांना त्यांच्या शेतीच्या गरजांसाठी तसेच शेतीशिवाय इतर कामांसाठी गरजेप्रमाणे आणि वेळेवर व किफायतशीर पद्धतीने कर्ज पुरविण्याचा आहे. जे शेतकरी पीक घेण्यासाठी, जोडधंद्यांसाठी आणि शेतीशिवाय इतर कामांसाठी मुदत कर्ज घ्यायला अन्यथा पात्र असतील त्यांना योजनेअंतर्गत शाखा किसान क्रेडिट कार्ड देऊ शकते असे सांगितले.
कर्ज पुरवठा होणार
बाजार समिती माजी सभापती एल.एस. पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस नारायण कोळी, प्रगतशिल शेतकरी अरुण नेमाडे, दत्तू भोळे, प्रमोद भोळे, मयुर भोळे, गोकुळ पाटील यांसह गोजोरा, खडका, कन्हाळे परिसरातील शेतकरी उपस्थित होते. सुत्रसंचालन व बँकेच्या विविध योजनेविषयी माहिती शाखा व्यवस्थापक राजेंद्र झांबरे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, एटीएममधून जसे गरजेप्रमाणे पैसे काढू शकतो, तसे किसान क्रेडिट कार्डद्वारे पैसे काढून शेतकरी कर्जासाठी प्रत्येक वेळी बँकेत जाण्याचा त्रास वाचवू शकतात. कार्ड मिळवण्यासाठी शेतकर्याकडे स्वतःची शेती असणं आवश्यक आहे. शिवाय शेतमजुर, संयुक्त शेती करणारे शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत असल्याचे सांगितले.