शेतकर्‍यांना आता दोन कृषिपंपांसाठी स्वतंत्र डीपी!

0

कळस । महावितरणने दोन कृषिपंपांसाठी एक डीपी देण्याचे नियोजन केले आहे. लवकरच वीजजोडणीसाठी पैसे भरलेल्या, परंतु प्रत्यक्षात जोडणी न मिळालेल्या शेतकर्‍यांना दोन कृषिपंपांसाठी एक स्वतंत्र डीपी दिला जाणार आहे. त्याचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. शेतकर्‍यांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे.राज्यात सध्या 40 लाख 68 हजार 220 कृषिपंपधारक शेतकरी आहेत. याशिवाय मार्च 2018 अखेरपर्यंत कृषिपंप वीजजोडणीसाठी तब्बल 2 लाख 49 हजार 357 इतक्या शेतकर्‍यांनी महावितरणकडे पैसे भरले आहेत.

यातील बहुतेक शेतकर्‍यांनी चार ते पाच वर्षांपूर्वीच महावितरणकडे पैसे भरलेले होते. आता अशा शेतकर्‍यांना कृषिपंपासाठी वीजजोडणी देण्यासाठी महावितरणने उच्च दाब वितरणप्रणालीचे नियोजन केलेले आहे. या प्रणालीद्वारे केवळ दोन कृषिपंपांसाठी एक स्वतंत्र डीपी दिला जाणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणकडून पाच हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

बारामती परिमंडळातील सोलापूर, सातारा जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील सुमारे 32 हजार कृषिपंपांसाठी पहिल्या टप्प्यात स्वतंत्र वीजजोडणीची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. त्यामुळे खंडित वीजपुरवठ्याच्या जाचातून शेतकजयांची सुटका होण्यास मदत होणार आहे सध्याच्या पद्धतीनुसार, शेतकर्‍यांना 65 व 100 केव्हीए क्षमतेच्या रोहित्रातून 15 ते 20 ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. यामुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते व वीजहानी मोठ्या प्रमाणात होते. शिवाय शेतकर्‍यांना कमी दाबाने वीजपुरवठा होतो.

वीजेच्या समस्या सुटणार
वारंवार बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होणे, तांत्रिक वीजहानी, रोहित्र बिघाड, विद्युत अपघात आदींना महावितरणला सामोरे जावे लागते.या सर्व अडचणींवर यामुळे मात करता येणे शक्य होणार आहे. या योजनेअंतर्गत प्रतिकृषिपंप 2 लाख खर्च अपेक्षित आहे. या योजनेवर 4496.69 कोटी व नवीन उपकेंद्रासाठी लागणारा अंदाजे खर्च 551.44 कोटी अशा एकूण 5,048.13 कोटी रुपये खर्च होणार आहेत.