शेतकर्‍यांना कर्जमुक्त करा आणि पुन्हा कर्जबाजारी करू नका !

0

धुळे । शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने कर्जमुक्त करून त्यांना पुन्हा पुन्हा कर्जमाफी देण्याची वेळ येऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांना सादर करण्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे उपायांचा मसुदा (प्रस्ताव) मंगळवारी जिल्हा प्रशासनाला सुपूर्द करण्यात आला. त्यासाठी देवपुरातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यापासून दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जळगावातही जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. शेतकर्‍यांच्या मसुद्याबाबत सरकारने शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्याचे आवाहन या निवेदनात करण्यात आले आहे.

मसुद्यावर सकारात्मक निर्णय घ्या
शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रवी देवांग, उत्तर महाराष्टअध्यक्ष शशिकांत भदाणे, कार्यकारिणी सदस्य शांतूभाई पटेल, जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या वेळी रवी देवांग यांनी मार्गदर्शन केले व शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांना निवेदन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मसुद्यावर गंभीरपणे सकारात्मक विचार करून शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करावी, अशी अपेक्षा मसुद्यात व्यक्त करण्यात आली आहे.

बाजारातील हस्तक्षेप थांबवावा
सरकारने शेतीमालाच्या व्यापारावरील सर्व बंधने उठवून बाजारातील हस्तक्षेप थांबवावा, शेतीमालाचे भाव नियंत्रित करण्यासाठी निर्यात शुल्क वाढविणे, निर्यातीवर बंदी घालणे, व्यापारी साठ्यांवर मर्यादा घालणे, विक्री किमतीवर मर्यादा घालणे आदी उपाय कायमस्वरूपी बंद करावेत, शेतकर्‍यांना खुल्या अर्थव्यवस्थेचा लाभ मिळू द्यावा, त्यासाठी आवश्यक वस्तूंच्या कायद्यातून शेतीमाल वगळावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.