कडूस । कृषी पदवी अभ्यासक्रमांतर्गत सहा महिन्यांच्या कृषीविषयक प्रात्यक्षिक अभ्यासक्रमासाठी खेड तालुक्याच्या पश्चिम भागात कडूस, चासकमान यांसह विविध गांवात कृषीपदवी विद्यार्थिनी दाखल झाल्या आहेत. त्यांना ’कृषीदूत’ आणि ’कृषीकन्या’ संबोधले जाते. हे कृषीदूत शेतकर्यांबरोबर राहुन शेतीविषयक माहिती व शेतीतील समस्या व अडचणी समजून घेऊन शेतकर्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी मार्गदर्शन करत असल्यामुळे शेतकर्यांना याचा चांगला फायदा होत आहे.
शेतातील उंदीर नियंत्रणासाठी परिसरातील शेतकर्यांच्या शेतामध्ये जाऊन कृषीकन्यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. उंदीर नियंत्रणासाठी उपाय योजण्याचे प्रात्यक्षिक त्यांनी शेताच्या बांधावर दाखवले. या विद्यार्थ्यांनी कडूस गावात शेतांमध्ये शिवार फेरी काढून, शेतीविषयक मार्गदर्शन केले. शेतकर्यांच्या मदतीने कृषी प्रदर्शन, बिज प्रक्रिया, चतु:सुत्री भात लागवड, आधुनिक बटाटा लागवड, सुधारित कांदा लागवड, माती परिक्षण, किटक नियंत्रण, आधुनिक तंत्रज्ञान, जैव विविधता व शेतीविषयक विविध माहिती कृषिकन्यांनी शेतकर्यांना दिली. यावेळी कृषी कन्या प्राजक्ता नवाते, शामली महांगरे पाटील, सुकन्या निकुम, मोनाली रणवरे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.