बारामती । बारामतीत पवारांनी सहकार रूजविला नाही हे वास्तव नाकारून चालणार नाही. पवारांना मात्र सहकारच विकायचा आहे. अजित पवार यांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर सहकारी तत्वावर बाजार सुरू केला होता. या बाजारचे अजित पवारांनी वाटोळे केले. त्याचबरोबर सहकारी तत्त्वावर पणदरे येथे सुतगिरणी सुरू केली. मात्र, तीही मोडीत काढली. साखर कारखाने खासगी कंपन्यांच्या दावणीला बांधून शेतकरीही दावणीला बांधायचे आहेत, अशी टिका माळेगाव कारखान्याचे जेष्ठ संचालक चंदरअण्णा तावरे व रंजनकाका तावरे यांनी रविवारी केली.
माळेगाव कारखान्याला पाण्याचा प्रश्न उद्भवणार असल्याचे अजीत पवार सांगत आहेत. मात्र, छत्रपती व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांना कोठून पाणी मिळणार या प्रश्नाचे उत्तर ते देऊच शकत नाहीत. कारण त्यांना शेतकर्यांच्या प्रगतीपेक्षा राजकारण जास्त महत्त्वाचे आहे. माळेगाव कारखाना पवारांच्या हातून गेल्यापासून त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे. म्हणूनच माळेगाव कारखान्याच्या परिसरात येऊन ते गरळ ओकत असल्याचे तावरे यांनी सांगितले. पण, आम्ही त्यांना भिणार नाही. सभासद आमच्या पाठीशी आहेत. आमची खोडी पवारांना नक्कीच परवडणार नाही त्यामुळे त्यांनी आमच्या कारखान्याच्या विकासाच्या आड येता कामा नये, असा इशाराच रंजनकाका तावरे व चंदरआण्णा तावरे यांनी दिला आहे.
सहकारी कारखाने जिवंत ठेवण्याचे आवाहन
काही सभासदांनी चुकीची भूमिका घेतली तर सर्वांबरोबर त्यांचेही नुकसानच होईल, हे लक्षात घेतले पाहिजे. माळेगाव सहकारी साखर कारखाना अडचणीत आला तर खासगी साखर कारखान्यात ऊसतोड करणे, ऊसाच्या वजनमापात घटतूट हे त्यांचे मर्जीवर अवलंबून राहील हा भविष्यातील धोका ओळखून विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. आपल्याच शेजारचा सोमेश्वर कारखान्याला सात ते साडेसात लाख टन ऊस असतानासुध्दा दररोज 4 हजार टन गेटकेन ऊस गाळत आहे. याची जबाबदारी कोणाची मग माळेगावनेच गेटकेन घेतल्यास पवारांचा आक्षेप का? असा सवाल कारखान्याचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांनी उपस्थित केला. माळेगाव कारखान्याने गेटकेन गाळप केल्यास सभासदांना ऊसाचा दर चांगला मिळतो आहे. तसेच गेटकेनधारकांनाही सर्वात जास्त भाव मिळत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सहकारी साखर कारखाने जिवंत ठेवायचे, असे आवाहनही तावेर यांनी केले.