भुसावळ। मध्य रेल्वेच्या तिसर्या व चौथ्या रेल्वे मार्गासाठी टाकलेल्या साहित्याने शेतकर्यांचे नुकसान होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील यांनी एडीआरएम अरुण धार्मिक यांना निवेदन दिले. तालुक्यातील साकेगाव शिवारातील शेतकर्याच्या शेतात विविध बांधकाम साहित्य टाकण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने जमीन संपादन प्रक्रियेपुर्वीच संबंधित जागेवर बांधकाम करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे शेतकरी मोबदला मिळण्यापासून वंचित आहे.
शेतकर्यांच्या शेतीवर घाला घालण्याचा प्रकार
या जमिनीवर शेकडो वर्षांपासून आपला चरितार्थ शेतकरी चालवत आहे. वास्तविक पाहता शेतजमिनी घेतांना रेल्वे अधिग्रहणामुळे शेती व शेतकर्यांवर होणार्या परिणामांचा विचार होण्याची गरज होती. त्यासंदर्भात समिती गठीत करुन त्याचा अहवाल आल्यावर त्यानुसार कारवाई व्हायला हवी होती. मात्र यासंदर्भात चालढकल करण्यात येवून शेतकर्यांच्या शेतीवर घाला घालण्याचा प्रकार मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे.
मागण्या पूर्ण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यात संबंधित शेतकरी, शेतकर्यांचे कुटुंब व परिसरातील नागरिकांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेदेखील सहभागी होतील. निवेदनावर जिल्हा परिषद उपगटनेता तथा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, विजय सोनवणे, रविंद्र गुरव, संजय मांडे, बापू सोनवणे, पवन मेहरा, दिपक राणे, निलेश निमसे, मंगेश पाटील आदींच्या स्वाक्षर्या आहे.
या आहेत मागण्या
मध्य रेल्वेच्या नवीन लाईन टाकण्यासाठी संपादनापुर्वीच करण्यात आलेल्या शेतकर्यांच्या शेतीचा मोबदला तात्काळ देण्यात यावा, संपादित शेतीचा मोबदला राष्ट्रीय महामार्गाप्रमाणेच मिळावा, शेतकर्यांची परवानगी घेवूनच त्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्याची कारवाई करण्यात यावी, जमिन संपादित करण्यात आलेल्या शेतकर्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तिस मध्य रेल्वेच्या सेवेत कायम सामावून घेण्यात यावे, रेल्वे लाईन टाकण्याच्या कामामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला तात्काळ मिळावा.