शेतकर्‍यांना न्याय न दिल्यास तहसील कार्यालयांना कुलूप ठोकणार

0

माजी आमदार संतोष चौधरींचा इशारा ; मेळाव्याआडून सुशिक्षीत बेरोजगारांची फसवणूक ; खासदारांच्या कारभारावर चौधरींची सडकून टिका

भुसावळ- निवडणुकीच्या तोंडावर खासदार रक्षा खडसे सक्रिय झाल्या असून आताच त्यांना बहिणाबाईंची आठवण झाली असून रेल्वे बोर्डाने मंजूर केलेल्या रेल्वेच्या सरकत्या जिन्याच्या कामांचे उद्घाटन दोन-दोन वेळा डीआरएम यांची मर्जी नसतानाही त्या करीत असून गोरगरीबांची झोपडपट्टी तुटली होती तेव्हा खासदार कुठे होत्या? असा सवाल माजी आमदार संतोष चौधरी यांनी करीत खासदारांच्या कारभारावर टिका केली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी यांचा नागरी सत्कार शहरातील तेली समाज मंगल कार्यालयात मंगळवारी सायंकाळी करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार चौधरी यांनी भाजपा सरकारसह खासदारांवर आपल्या शैलीत टिकास्त्र सोडले.

तर जिल्ह्यातील तहसील कार्यालयांना कुलूप ठोकणार
जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला असलातरी शेतकर्‍यांना त्याचा काही एक लाभ झालेला नाही, सर्वसामान्य नागरीक त्रस्त असून शेतकर्‍यांना न्याय मिळण्यासाठी आता तहसील कार्यालयांनाच कुलूप ठोकणार असून जिल्ह्यात अशा पद्धत्तीचे आंदोलन छेडले जातील, असा इशारा माजी आमदार संतोष चौधरी यांनी भाषणात दिला. प्रत्येक तालुक्याला आपण कुलूप पुरवू व एक चावी पवार साहेबांकडे तर दुसरी जिल्हाधिकार्‍यांकडे देवू, असा इशारा त्यांनी दिला.

भुसावळात वाघूरप्रमाणेच भ्रष्टाचाराचा घाट
वाघूरप्रमाणेत भुसावळात अमृत योजनेच्या माध्यमातून भ्रष्टाचार करण्याचा घाट सत्ताधारी घालत असून केवळ पाईप लाईन अंथरून बिले काढली जात आहे, आता तर बंधार्‍याला तापी नदीत मंजुरी नसल्याची बाब समोर आली असून पूर्वी हतनूरवर असलेला बंधारा तापीत आणण्याचा घाट घालण्यात आला व या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप चौधरी यांनी करीत जिल्हाधिकार्‍यांना याबाबत आधीच निवेदन दिले असून त्यांनी दखल न घेतल्यास 26 जानेवारी रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. भुसावळातील मामाजी टॉकीज रस्त्याचे ट्रीमीक्स सांगून केवळ आयपीएस बांधकाम करून निधी हडपण्यात आला असून सत्ताधारी नगरसेवकांकडूनही टक्केवारी मागितली जात असल्याचा आरोप चौधरींनी केला.

रावेर लोकसभेत परीवर्तन घडणार
रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादी बहुमताने जिंकणार असून यावेळी परीवर्तन होणार असल्याचा आशावाद माजी आमदार चौधरी यांनी व्यक्त करीत खासदार खडसेंच्या कार्यपद्धत्तीवर टिका केली. आधी सहा व आता 11 निष्क्रीय खासदारांमध्ये त्यांचा समावेश झाल्याचे त्यांनी सांगत बेरोजगारांचा मुक्ताईनगरात मेळावा घेण्यात आला मात्र बेरोजगार मुलाखतपत्र घेवून गेल्यानंतर कंपनीने ‘आम्ही तुम्हाला नोकरीच दिली नसल्याचे बाब पुढे आली’ व नंतर संबंधितानी खासदारांकडे तक्रार केल्यानंतर तीन-तीन हजार रुपये उकळण्यात आल्याचा आरोपही चौधरींनी केला. आता जनतेनेच यांना घरी बसवण्याचे ठरवले असून परीवर्तन होणार असल्याचा आशावाद चौधरी यांनी व्यक्त केला.

सरकारला जाहीरनाम्याचा विसर -अरुणभाई गुजराथी
विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी म्हणाले की, सचिन यांची सभापतीपदी वर्णी म्हणजे राजकीय क्षितीजावरचा उदय आहे. भाजपा सरकारला सरकार कस चालवायचे हे कळत नाही, सरकारला जाहीरनाम्याचा विसर पडला असून दहा टक्केही कामे झालेली नाही. पाच वर्षात पाच राज्यांमध्ये भाजपा मागे पडत आहे हा भाजपाला इशारा असून व्यापारी हा भाजपाचा कणा असलातरी तोदेखील नाराज असल्याचे ते म्हणाले.

आमदारांनी योजनाच रद्द केल्या -रवींद्र पाटील
सत्ताधारी बळाचा वापर करून गुन्हे दाखल करीत असून आमदार संजय सावकारे यांनी साकेगावात चौधरींची सत्ता असल्याने योजनाच रद्द केल्याचा आरोप प्रास्ताविकात जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील यांनी केला. आम्ही योजनेसाठी पाठपुरावा केला मात्र श्रेय आमदारांनी घेतल्याचे ते म्हणाले. क्रीडा संकुल, ग्रामीण रुग्णालय माजी आमदार चौधरींच्या काळात मंजूर झाल्याचे ते म्हणाले.

तर मीही होवू शकतो खासदार -रमेश पाटील
माजी आमदारांनी आपल्या स्वीय सहाय्यकाला मंत्री केले त्यामुळे त्यांच्यात ती ताकद आहे, वेळ पडली तर मलाही ते खासदार करू शकतात, अशी कोपरखळी माजी आमदार रमेश पाटील यांनी लगावत आपल्या सुप्त इच्छाही व्यक्त केल्या. पक्षात ज्यांचा सन्मान केला जात नाही त्यांना तिकीट दिले जात असल्याची टिका त्यांनी स्वपक्षावरच केली. चोपड्यातील कर्तव्यदक्ष निरीक्षकांची बदली म्हणजे भाजपाने पदाचा केलेला दुरुपयोग असल्याचे ते म्हणाले. संजय गरूड यांनी सहकार क्षेत्र अडचणीत असल्याचे सांगून हे क्षेत्र मोडकळीस आणण्याचे काम भाजपा सरकार करीत असल्याचे सांगितले. माजी आमदार अरुण पाटील यांनी राजकारणात अनुभवशून्य राजकारणी येत असल्याची टिका केली.

कृउबात होणार कांद्याचा लिलाव -सचिन चौधरी
कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा लिलाव होण्यासाठी प्रयत्न करणार असून लवकरच कृउबाचे प्रशस्त जागेत स्थलांतर करण्यात येणार असल्याची ग्वाही कृउबाचे नूतन सभापती सचिन चौधरी यांनी दिली. ज्वारी खरेदी केंद्र अवघे 14 दिवस चालले त्यातही 31 शेतकर्‍यांच्या धान्याची मोजणी झाल्याने अन्य शेतकरी वार्‍यावर असून त्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.

दळभद्री सरकारकडे पैसाच नाही -अ‍ॅड.रवींद्र पाटील
सध्याचे सरकार हे दळभद्री असून त्यांच्याकडे शेतकर्‍यांना देण्यासाठी पैसेच नसल्याने डिसेंबरपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवली जात आहेत, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्या पाटील म्हणाले. खरेदी केंद्रांना मुदतवाढ न दिल्यास धान्य तुमच्या दारात टाकू, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला. मोदींच्या कारभारावर त्यांनी टिका करीत जिल्ह्यात तीन मंत्री असलेतरी ते उपयोगशून्य असल्याचे ते म्हणाले. दुष्काळानंतरही शेतकर्‍यांच्या पदरात काहीही नसल्याचे ते म्हणाले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
माजी विधानसभा अध्यक्षा अरुणभाई गुजराथी, माजी आमदार अरुण पाटील, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, नितीन मानकर, ईश्‍वर रहाणे, मुकेश येवले, पंढरी पाटील, सोपान भारंबे, ललित बागुल, अ‍ॅड.तुषार पाटील, दुर्गेश ठाकूर, गटनेते राजेंद्र चौधरी, राहुल बोरसे, सचिन पाटील, इम्तियाज शेख, देवेंद्र खेवलकर, सिकंदर खान, माजी गटनेते विनोद तराळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.