पुणे । पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत खरीप 2017 मधील योजनेत सहभागी शेतकर्यांना भात ,मूग ,उडीद, सोयाबीन पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम आठवडाभरात त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांनी दिले. नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्यांना तातडीने मिळावी यासाठ शुक्रवारी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली.
नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ जमा करा
‘विमा कंपन्यांना सरकारने पीक उत्पादकतेविषयी सर्व आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे. त्या अनुषंगाने शेतकर्यांना नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ जमा करण्यात यावी,’ असे विजयकुमार म्हणाले.तसेच राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ केंद्रावरून नोंद झालेल्या शेतकर्यांच्या बँक खात्याशी आधार जोडणी करण्यात आली आहे. अशा खात्यांचे ताळमेळ करताना जास्त वेळ लावू नका. त्यांच्या खात्यात तातडीने रक्कम जमा करा, अशा स्पष्ट सूचना अपर मुख्य सचिव विजयकुमार यांनी या वेळी बोलताना केल्या.
81 लाख शेतकर्यांनी काढला विमा
गेल्या खरीप 2017 मध्ये सुमारे 81 लाख शेतकर्यांनी पीकविमा काढला होता. त्यातील सुमारे 8 लाख शेतकर्यांनी आपले सरकार केंद्राच्या माध्यमातून नाव नोंदणी केली आहे. या आठवड्यातच त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करावी, असेही विजयकुमार यांनी या वेळी बोलताना सांगितले. या बैठकीस ओरिएंटल इन्श्युरन्स, युनायटेड इंडिया इन्श्युरन्स, अग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनी ऑफ इंडिया, नॅशनल इन्श्युरन्स कंपनी, रिलायन्स जनरल आणि इतर कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.